
Marathwada Political News : राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष व विधान परिषद सदस्य असलेले बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदी वर्षभरापूर्वी पक्षात आलेले माजी आमदार विजय गव्हाणे यांची निवड झाली आहे. (Parbhani NCP News) आमदार दुर्राणी, माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, प्रताप देशमुख हे नेते सोबत नसताना पक्षाची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवण्याचे मोठे आव्हान विजय गव्हाणे यांच्यासमोर आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये फुट पडल्यानंतर परभणी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान, विधान परिषद सदस्य व जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार विजय भांबळे व भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केलेले माजी आमदार विजय गव्हाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमुखाने शरद पवार यांना पाठिंबा व्यक्त केला.
मात्र अनेक अडचणीमुळे आमदार दुर्राणी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाला हा मोठा धक्का समजला जातो. राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान या पक्षाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून त्या राष्ट्रीय स्तरावर सक्रीय असतात. (Parbhani) माजी आमदार विजय भांबळे यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितामुळे शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यावर सोपवली. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार म्हणून निवडून आलेल्या विजय गव्हाणे यांनी भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. जानेवारी २०२२ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. फर्डे वक्ते म्हणून प्रसिद्ध असलेल्या विजय गव्हाणे यांचा अनेक आंदोलनात महत्वाचा सहभाग राहिला आहे.
विशेषतः शैक्षणिक संस्था महामंडळाच्या माध्यमातून शासन दरबारी संस्थाचालकांचे प्रश्न आग्रहाने त्यांनी मांडले. शरद पवार यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघटीत करण्याचे शिवधनुष्य गव्हाणे यांना पेलावे लागणार आहे. भारतीय जनता पक्षातील पूर्वाश्रमीचे सहकारी तसेच ज्यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षकार्य केले त्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) मधील जुने सहकारी हे आता राजकीय विरोधक असल्याने पक्षाची विस्कटलेली घडी बसवताना गव्हाणे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.