Congress News : काँग्रेस अडकली गटबाजीत; निलंगेकर-साळुंकेंचे स्वतंत्र मेळावे!
निलंगा तालुक्यात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली असून, अशोक पाटील निलंगेकर आणि अभय साळुंके यांनी स्वतंत्र मेळावे घेतले आहेत.
ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटबाजीमुळे काँग्रेसची अडचण वाढली आहे.
दोन्ही गटांमधील तणावामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पक्षश्रेष्ठींना मध्यस्थी करावी लागणार आहे.
राम काळगे
Latur Political News : नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाली आहे. आता खऱ्या अर्थाने राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येणार आहे. पण दुसरीकडे पक्षांमधील अंतर्गत गटबाजी संपण्याची काही चिन्हं नाहीत. निलंगा शहरातील काँग्रेस गटबाजीत अडकल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर आणि जिल्हाध्यक्ष अभय साळुंके या दोन नेत्यांनी कार्यकर्त्यांचे स्वतंत्र मेळावे घेत वाद चव्हाट्यावर आणले आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात पक्षातील ही गटबाजी काँग्रेसला न परवडणारी आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना काँग्रेसकडून कार्यकर्त्यांचे दोन मेळावे आयोजित करून एक प्रकारे गटबाजीला बळ दिले जात आहे. एकीकडे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर तर दुसरीकडे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके या दोन्ही नेत्यांनी वेगळे मेळावे आयोजित केल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहे. निलंग्यातील काँग्रेस देशमुख व निलंगेकर या दोन गटात विभागल्याने कार्यकर्त्यांची अवस्था'कोणता झेंडा घेऊ हाती' अशी झाली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघावर मजबूत पकड होती. त्यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्याची फळी होती, म्हणूनच त्यांनी प्रदीर्घकाळ या मतदारसंघाचे नेतृत्व केले. सध्या अशोकराव पाटील निलंगेकर काँग्रेसमध्ये आपले नेतृत्व सिध्द करत असले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना डावलून अभय साळुंके यांना पक्षाने संधी दिली. त्यांना मतदानही मोठ्या प्रमाणात मिळाले. मात्र, त्यांचा थोड्या मताने पराभव झाला.
साळुंके यांच्याकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आल्यानंतर उघडपणे गटबाजीला सुरवात झाली असून, मुद्दा पटवून सांगण्याची शैली, वक्तृत्व, सोबत युवकाची फळी याच जोरावर त्यांनी निलंग्यात बस्थान बसवले आहे. तर काँग्रेस पक्षाचे खरे निष्ठावंत आम्हीच आहोत, म्हणत मागील महिन्यात अशोक पाटील निलंगेकर यांनी निष्ठावंत निलंगेकर काँग्रेस म्हणून बुथ प्रमुख, इच्छुक उमेदवार, पदाधिकरी यांची स्वतंत्र बैठक घेतली. तर अभय साळुंके यांनीही चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचे प्रभारी बाळासाहेब देशमुख यांना बोलावून निवडणुकीबाबत मेळावा घेतला.
तिढा सोडविणार का?
विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केले म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्यात आली. तर अभय साळुंके यांचीही तक्रार अशोकराव पाटील यांनी केली. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही बढती दिली असून, संभाव्य निवडणुकीत हा तिढा पक्षश्रेष्ठी कसा सोडवणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मागील पंचायत समिती निवडणुकीत 18 पैकी 16 जागेवर भाजपने विजय मिळवला. तर मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आणत जिल्हा परिषदही ताब्यात घेतली होती. नगरपालकेतही भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 'देशमुख विरूद्ध निलंगेकर'असाच प्रचार झाल्याने निलंगा मतदारसंघातील मतदारांनी निलंगेकरांना तारले होते. मात्र, आता निवडणुकीत कसे समीकरण राहणार? हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
महाविकास आघाडी ही भाजपच्या एकहाती सत्तेला कशा पध्दतीने भेदणार? हे निवडणूक झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे निलंग्यातून चारवेळा निवडून आले आहेत. पालकमंत्री असताना त्यांनी जिल्हा परिषद व महानगरपालिकेवर सत्ता काबीज केली होती. त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांच्या निवडणुकीतील नियोजनाला गटबाजीमध्ये विखुरलेली काँग्रेस कशा पध्दतीने शह देणार? असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करीत आहे.
FAQs
1. निलंगा काँग्रेसमध्ये नेमकी गटबाजी कशामुळे झाली?
अशोक पाटील निलंगेकर आणि अभय साळुंके यांच्या नेतृत्वावरून मतभेद निर्माण झाले आहेत.
2. या दोन्ही गटांनी काय केलं?
दोन्ही गटांनी स्वतंत्र मेळावे आयोजित करून आपापली ताकद दाखवली.
3. या गटबाजीचा काँग्रेसच्या निवडणुकीवर काय परिणाम होईल?
मतं विभागण्याची शक्यता असून पक्षाची स्थिती कमजोर होऊ शकते.
4. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी काय भूमिका घेतली आहे?
राज्य पातळीवरील नेते परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
5. निलंगा मतदारसंघाचा राजकीय महत्त्व काय आहे?
निलंगा हा लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून, येथे अनेकदा काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
