
Beed : उध्दव ठाकरेंनी २०१९ ला भाजपशी काडीमोड घेत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली होती. याचवरुन भाजप नेतेमंडळींकडून सातत्यानं पंतप्रधान मोदींचा मते मिळवून निवडणुका लढल्या आणि विश्वासघात करत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याची घणाघाती टीका केली जाते.पण आता यावर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचलं आहे.
बीड येथील शिवसेनेच्या ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रेतील जाहीर सभा झाली. या सभेत खासदार संजय राऊतांनी शिंदे गट व भाजपवर तुफान हल्ला चढवत खुलं आव्हान दिलं आहे. राऊत म्हणाले, विरोधक म्हणतात की, आम्ही मोदींचा फोटो लावून मते मागितली. मात्र तसं अजिबात नाही. आमचे श्रद्धास्थान असणारे बाळासाहेब ठाकरे अशा १ लाख मोदींवर भारी होते व अजूनही आहेत.
राहिला प्रश्न मोदींच्या फोटो वापरण्याचा तर कर्नाटकात मोदींनी ३६ जाहीर सभा घेतल्या, २७ रोड शो केले, पण जिथे जिथे मोदींनी सभा घेतल्या त्या सर्व ठिकाणी भाजपाचा सुपडासाफ झाला आहे. तेथेही भाजपने मोदींचे फोटो लावले होते, स्वत: मोदीही फिरले होते. मग पराभव का झाला? असा खडा सवालही राऊतांनी यावेळी भाजपला विचारला.
...तर मी राजकारण सोडेन!
आमच्याकडून ४० 'मिंधे' गेले आहेत, त्यांनी मोदींचा फोटो लावून जिंकून येऊन दाखवावं, राजकारण सोडेन, पुन्हा बाळासाहेबांचे नाव सांगणार नाही, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना दिलं आहे.
कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणारच..
महाराष्ट्राचं वातावरण झपाट्याने बदलत आहे. लोकांच्या मनात चीड आहे, संताप आहे. लोकं निवडणुकीची वाट पाहत आहेत. कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणारच असा विश्वासही संजय राऊतांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, जे आम्हाला म्हणतात की, तुम्ही मोदींचे फोटो वापरून निवडून आलात तर त्यांना सांगतो की, आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो, तुम्ही मोदी-शाहांचा फोटो लावा. मग तुम्हालाही कळेल की महाराष्ट्र काय आहे, मराठी माणूस काय आहे आणि हिंदुत्व काय आहे असा इशाराही राऊतांनी यावेळी भाजप शिवसेनेला दिला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.