

पैठण बाजार समितीत कांदा विकूनही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत
वजावटीनंतर एक रुपया बाकी असल्याची पावती व्हायरल झाली
खासदार कल्याण काळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्येवर आवाज उठवला
Paithan Market Committee News : राज्यातील शेतकऱ्यावर ओढावणारे आस्मानी आणि सुल्तानी संकट हे नवे नाही. पण रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या पीकाला जेव्हा बाजार समितीत कवडीमोल भाव मिळतो, तेव्हा त्याच्या मनाची अवस्था काय होत असेल? याचा विचार न केलेलाच बरा. अशाच एका कांदा उत्पादक शेतकऱ्याची कैफियत काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मांडली आहे.
25 गोण्या कांदा विकून शेतकऱ्याच्या हातात एकही रुपया आला नाही, उलट वजावट करून त्यांच्याकडेच एक रुपया बाकी असल्याची पावती काळे यांनी आपल्या सोशल मिडियावर व्हायरल केली. ही पोस्ट शेतकऱ्याची विदारक अवस्था दर्शवत असून शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत द्या, नाहीतर उद्या शेतात पिक नाही फक्त अश्रू असतील, अशा शब्दात खासदार काळे यांनी विदारकता मांडली.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यातील वरुडी येथील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याने नुकताच आपला कांदा विक्रीसाठी आणला होता. 25 गोणी कांदा शंभर रुपये प्रति क्विटंल दराने व्यापाऱ्याने खरेदी केला. त्याची रक्कम 1262 रुपये झाली. हमाली, तोलाई, गाडीचे भाडे, गोणीचा खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात एकही रुपया आला नाही, उलट त्याच्याकडेच एक रुपया शिल्लक असल्याची पावतीच कल्याण काळे यांनी समाज माध्यमावर व्हायरल केली.
ही फक्त पावती नाही, हा एका शेतकऱ्याच्या घामाचा, कष्टाचा आणि झोपलेल्या व्यवस्थेच्या अन्यायाचा पुरावा आहे. प्रकाश गलधर (रा.वरुडी ता.पैठण) शेतकरी बांधवाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण बाजार समितीत 25 गोणी कांदा विकला, वजन भरलं 1262 किलो. त्याची एकूण रक्कम आली फक्त ₹1262 आणि हमाली, तोलाई, भराई, वाराई, भाडे, गोणी खर्च वजा गेल्यावर शेतकऱ्याच्या हातात उरले काय?
उलट ₹1 तोट्यात तो गेला
ज्या शेतकऱ्याने महिनोन्महिने उन्हात, पावसात, थंडीत राबून कांदा पिकवला, त्याच कांद्याला आज मातीमोल भाव मिळतोय. ना उत्पादन खर्च निघतो, ना वाहतूक, मग शेतकरी जगणार कसा? फक्त घोषणा करणाऱ्या सरकारला शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का? एका बाजूला महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचा माल कवडीमोलाने विकला जातोय, हा कोणता विकास? असा संताप काळे यांनी व्यक्त केला.
आज कांदा उत्पादक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. कर्ज, नैराश्य आणि अपमान याशिवाय त्याच्या वाट्याला काय आलं? शेतकऱ्याला हमीभाव द्या, शेतमालाला योग्य किंमत द्या, नाहीतर उद्या शेतात पिक नाही फक्त अश्रू असतील, असा इशाराही काळे यांनी या पोस्टच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना दिला.
म्हणे कांदा खराब होता..
दरम्यान, खासदार कल्याण काळे यांच्या पोस्टनंतर सर्वत्र या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी काळे यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. तर पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी शेतकऱ्याचा कांदा खूप खराब होता. शंभर रुपये क्विटंल दराने खरेदी केली जात होती. व्यापाऱ्याने सदर शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला.
पण हमाली, तोलाई, उचल, गोणी व इतर खर्च वजा करता संबंधित शेतकऱ्याच्या हाती काहीच आले नाही ही वस्तुस्थिती असल्याचे सांगीतले. संबंधित शेतकऱ्याने या संदर्भात आमच्याकडे कुठलीही तक्रार केली नाही, त्यांनी संपर्क केला असता तर त्यांच्या काद्यांला आम्ही चांगला भाव मिळवून दिला असता, असे विखे यांनी सकाळ प्रतिनिधीशी बोलताना सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.