Marathwada BJP Political News : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. (Pankaja Munde News) भाजप त्यांना लोकसभेची उमेदवारी देणार अशाही चर्चा होत्या, पण सावरगांवच्या भगवान भक्तीगडावरून केलेल्या भाषणात पंकजा यांनी या सगळ्या शक्यता फेटाळून लावत आपण परळीतूनच लढणार असे स्पष्ट केले होते.
परंतु पंकजा मुंडे (Pankaja Munde) या परळीतून नाही, तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचा दावा भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी केला आहे. विशेष म्हणजे याची कुणकुण विद्यमान रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांना लागल्यामुळे त्यांचा कडाडून विरोध सुरू झाल्याचेही मुरकुटे यांनी म्हटले आहे.
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुरकुटे यांनी जाहीरपणे या गोष्टी सांगितल्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. (Marathwada) रासपचे अध्यक्ष महादेव जानकर आणि पंकजा मुंडे यांच्यातील बहीण-भावाचे नाते आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध पाहता हे शक्य असल्याचे बोलले जाते. दरम्यान, आमदार रत्नाकर गुटे यांनी मात्र `बाहेरून कोणीही आले तरी आम्ही त्यास पुरून उरू`, असे म्हणत दंड थोपटले असल्याचे सांगितले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पराभव झाला होता. धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर पंकजा यांना पक्षाकडून डावलले जात असल्याचा आरोपही सातत्याने त्यांच्या समर्थकांकडून केला गेला. राज्यसभा, विधान परिषदेवर संधी असतानाही पंकजा यांच्याऐवजी दुसऱ्यांना संधी दिली गेली. पंकजा यांनीही अनेक वेळा आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता पंकजा यांनी सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. अशातच आता पंकजा मुंडे परळीतून नाही, तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने केला आहे. संतोष मुरकुटे यांनी गंगाखेड येथील जाहीर भाषणात या संदर्भात माहिती देताना आमदार गुट्टे यांचा पंकजा यांच्या उमेदवारीला कसा विरोध सुरू आहे, हेही सांगितले.
भाजप, शिवसेना (शिंदे ) व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) गटाची युती झाली असल्याने अनेक दिग्गजांची तारांबळ होणार आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराची लॉटरी कोणाला लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. महायुतीच्या जागावाटपात परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडे गेल्यास भाजपला पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार आहे.
परळी विधानसभा मतदारसंघाशेजारी असणारा गंगाखेड मतदारसंघ हा पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरक्षित ठरू शकतो. महायुतीमुळे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहीण-भावातील राजकीय वैमनस्य संपल्याचे अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मेहुणे व गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांचे सहकार्य पंकजा यांना मिळू शकते. मतदारसंघातील जातीय समीकरणाचा विचार करता वंजारी समाज तसेच धनगर समाजाची संख्या निर्णायक आहे.
तसेच ऊसतोड कामगारही बहुसंख्य प्रमाणात या मतदारसंघात आहेत. पंकजा मुंडे यांना बहीण मानणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची साथ पंकजा मुंडेना विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावू शकते, अशीही चर्चा आहे. पंकजा मुंडे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा मिळू शकतो. पंकजा मुंडे यांनी नुकत्याच काढलेल्या शक्ती परिक्रमा यात्रेचे परभणी जिल्ह्यात जोरदार स्वागत झाले होते.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.