Parbhani Political News : 'एकवेळ भाऊ बहिणीला विसरू शकेन, पण बहीण मात्र आपल्या भावाला कधीच विसरू शकत नाही.', असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी परभणी येथे केले. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. सध्या अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या बहीण-भावाच्या नात्यामध्ये आलेला काहीसा दूरावा पाहता, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य अजितदादांना अवघडल्यासारखे करणारे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार, सदाभाऊ खोत व महायुतीमधील सहभागी पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी जानकरांसाठी चांगलीच बॅटींग केल्याचे दिसून आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे महादेव जानकर(Mahadev Jankar) यांना मुलासारखे समजत असत. यामुळे आमच्यात बहीण भावाचे नाते आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जानकर यांचा फोन आला व मी आज येथे आले. मात्र जानकर यांचा फोन नसता आला तरीही मी आले असते. कारण एकवेळ भाऊ बहिणीला विसरेन पण बहीण मात्र आपल्या भावाला कधी विसरत नाही.' पंकजा मुंडे यांचे वक्तव्य महादेव जानकर यांच्यासाठी असले तरी व्यासपीठावर उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ते अडचणीचे ठरले असल्याची चर्चा होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबीयांमधील मतभेद उघड झाले. सार्वजनिक कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र येऊनही अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी परस्परांना बोलणे टाळलेले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरुद्ध महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुनेत्रा पवार या उमेदवार असण्याचे जवळपास निश्चित आहे.
आईसमान असणाऱ्या वहिनीला माझ्या विरुद्ध उभे केले, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घर फोडल्याचा आरोप करत टीका केली. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांचे बहीण भावाच्या नात्याबद्दलचे वक्तव्य अजित पवार यांना निश्चितच टोचले असणार. महादेव जानकर आणि मुंडे कुटुंबाचे संबंध जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक आहेत.
परभणीतून प्रचाराला सुरुवात करण्यापुर्वी जानकर मुंबईत प्रज्ञाताई मुंडे यांची भेट व आशीर्वाद घेऊन आले होते. राखी पौर्णिमा, भाऊबीज, गोपीनाथ गडावरील दसरा मेळावा यासह मुंडे कुटुंबाच्या प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात जानकर आवर्जून हजर असतात. त्यानंतर बहीण-भावाच्या नात्याची प्रचिती आज पुन्हा आली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.