Parbhani Lok Sabha Election 2024: महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Parbhani Lok Sabha Constituency) उमेदवार महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. या वेळी जानकरांच्या प्रचारार्थ परभणीत महायुतीच्या वतीने मोठी सभा घेण्यात आली होती. या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. तसेच या वेळी भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. या सभेत पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर आयात केलेले उपरे उमेदवार आहेत, या विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) प्रचार सभेत बोलताना महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले. तसेच या वेळी महादेव जानकर हे बाहेरून आलेले उपरे उमेदवार आहेत. या विरोधकांच्या टीकेला मुंडे यांनी उत्तर दिलं. सभेत मुंडे म्हणाल्या, महादेव जानकर हे एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व आहे. सामान्य माणसाच्या विकासासाठी त्यांनी घर सोडलं आहे, ते अविवाहित आहेत. कुटुंबीयांसाठी चार पैसे कमवायची त्यांना आवश्यकता नाही. त्यांच्यावर बाहेरून आल्याचा आरोप होत असेल तर तो बरोबर नाही. राज्याच्या हितासाठी, सर्वसामान्य माणसासाठी भटक्या-विमुक्तांसाठी काम करणारा माणूस हा भटकतच असतो. तुमच्या विकासासाठी बारामतीमध्ये (Baramati) सुरू झालेला त्यांचा प्रवास भटकत भटकत परभणीत (Parbhani) येऊन थांबलेला आहे. त्यांना विजयी करण्याची जबाबदारी मंचावरच्या माणसांची आहे तेवढीच तुमची आहे, असं मुंडे म्हणाल्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, मुंडे म्हणाल्या, मी आज इथे प्रचाराच्या सभेला आले, काल जानकरांनी फोन केला ते म्हणाले, माझा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी तुम्ही यायचं आहे. परंतु, त्यांनी फोन केला नसता तरीही मी आले असते, यात शंका नाही. मला आजही तो दिवस आठवतो चौंडीला मुंडेसाहेबांबरोबर जानकरांच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडेसाहेब म्हणाले होते, जानकरांना मी माझा मुलगा मानतो.
कोणत्याही चिन्हावर लढले असते तरी मी आले असते
महायुतीत सामील झाल्यानंतर जानकर विधान परिषदेवर आमदार म्हणून गेले. त्यानंतर ते मंत्री झाले. त्यांनी अनेक चांगली कामं केली. महायुतीचे ते उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रचाराची जबाबदारी आमची आहे. परंतु महादेव जानकर कधीही आणि कसेही व कोणत्याही चिन्हावर उभे राहिले असते तरी मी बहीण म्हणून गेलेच असते. भाऊ बहिणीला विसरतो, पण बहीण कधीच विसरत नाही, असंही ते या वेळी म्हणाल्या.
मुंडे म्हणाल्या, "जानकरसाहेब तुम्ही या लोकांसाठी इथे एक घर घ्या, तुम्ही एकटेच आहात त्यामुळे छोटं घर घ्या. तुमच्या घरासमोर वंचित पीडितांची गर्दी झाली पाहिजे. त्यांचं आयुष्य घडविण्यासाठी तुम्ही काम करा."
(Edited By Jagdish Patil)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.