

Parali Muncipal Council News : परळी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युतीने एकत्रितपणे लढत सत्ता राखली. आमदार धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या जवळचा मोहरा फोडत मुंडे यांना धक्का दिला होता. माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख हे कधी काळी धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांनाच गळाला लावले.
परळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुंडे भावंडांविरुद्ध पॅनल उभे करत दीपक देशमुख यांनी पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती. निवडणुक प्रचार, मतदानानंतर ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थितीत करत दीपक देशमुख यांनी परळीत चांगली हवाही केली होती. पण निवडणूक निकालानंतर ती हवाच ठरली.
दरम्यान, परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दारून पराभव पत्करावा लागल्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर काही पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. आता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी राजीनामा देत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर तोफ डागली आहे. पक्षात दलालीचा कारभार वाढला असून सुपारीबाज लोकांच्या कारभाराला कंटाळून मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी जाहीर केले.
खासदारांच्या चुकीच्या नियोजनाचा बोलबाला दिसत असल्याने तक्रार कुठे करायची? असे म्हणत देवराव लुगडे यांनी आपल्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील धुसफुस समोर आली आहे. विकास पुरुष म्हणून ओळख असलेल्या शरद पवारांच्या विचारांना मानणारा मोठा वर्ग असताना देखील या ठिकाणी चुकीचे ध्येयधोरणे राबवल्यामुळे मी खासदारांना व्हिडिओ कॉल करून याबाबत तक्रार दिली होती. पण त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप लुगडे यांनी केला.
देवराव लुगडे यांनी याआधी सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल करत खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली होती. 'या भागात पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका. येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी पक्षासाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या',असे आवाहन त्यांनी केले होते.
अडचणीच्या काळामध्ये आम्ही पक्ष वाढवायचा, लोकांमध्ये जायचं, दुश्मनी घ्यायची, आंदोलन करायचे, अंगावर खोट्या केस घ्यायच्या आणि निवडणुकीत दलाल लोकांना तुम्ही सोबत घेत असाल तर ते योग्य नाही. पुन्हा आमच्या गोरगरिबांची ही भावना होऊ देऊ नका, की हा भांडवलदारांचा, श्रीमंताचा पक्ष आहे. श्रीमंती आणि पैसा बघून इथे प्राधान्य दिले जाते.
चाटुगिरी, भामटेगिरी, पुढे-पुढे करणाऱ्याला प्राधान्य दिले जाते ही आमची मानसिकता होऊ देऊ नका. कारण हा पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. येणाऱ्या काळात परळीत पक्ष उभा करायचा असेल तर चांगल्या लोकांना सोबत घ्या, अशा शब्दात या व्हिडिओच्या माध्यमातून लुगडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना सुनावले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.