

Parbhani Poliitcs : परभणी जिल्हा बँकेवर वरपूडकर-बोर्डीकर गटाने वर्चस्व मिळवल्यानंतर अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची चर्चा काही दिवसापासून सुरू होती. सुरेश वरपूडकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार अशी शक्यता वर्तवली जात असताना आज माजी अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर यांची बिनविरोध निवड झाली.
तर उपाध्यक्ष पदी राजेश पाटील गोरेगावकर यांना संधी देण्यात आली आहे. आमदार सईद खान यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु नंतर त्यांनी तो मागे घेतला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष दोन्ही बिनविरोध निवडण्यात आले. राज्यमंत्री पद, जिल्ह्याचे पालकमंत्री पद मेघना बोर्डीकर यांच्याकडे आहे.
तर जिल्हा बँकेत रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह त्यांच्या दुसऱ्या कन्या भावना याही संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. यावरून जिल्ह्याच्या राजकारणावर बोर्डीकरांची पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद निवडीसाठी आज नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली.
अध्यक्षपदासाठी रामप्रसाद बोर्डीकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित झाली होती. उपाध्यक्षपदासाठी राजेश पाटील गोरेगावकर आणि आमदार सईद खान यांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज छाननीनंतर दोन्ही अर्ज वैध ठरले.
मात्र माघारीच्या मुदतीत आमदार सईद खान यांनी अर्ज मागे घेतल्याने गोरेगावकर यांचीही बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. या निवडीमुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुती समर्थक गटाचे वर्चस्व कायम राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व संचालक एकत्र आलो आहोत. ही निवड कोणत्याही व्यक्तीची नसून सहकार आणि विकासाच्या विचारांची आहे. शेतकरी, सभासद आणि ठेवीदारांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी पारदर्शक व निर्णयक्षम कारभार केला जाईल.
शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, बँकेची आर्थिक ताकद वाढविणे आणि सहकार क्षेत्राला नवी दिशा देणे, यावर आमचा भर राहील. सर्वांना विश्वासात घेऊन बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करू. सहकार चळवळीला अधिक बळकटी देणे हेच आमचे ध्येय असेल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष रामप्रसाद बोर्डीकर यांनी दिली.