परभणी महापालिकेसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव आणि माजी मंत्री बाबाजानी दुर्राणी यांच्यासह इतर नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या निवडणुकीत सत्ता कोणाची राहणार यावर परभणीच्या पुढील राजकीय समीकरणांचा थेट परिणाम होणार आहे.
Local Body Election 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकारण तापणार आहे. जिल्ह्यातील एकूण सात पालिका आणि एक महापालिका, एका नगर पंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने सत्ताधारी-विरोधकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
मेघना बोर्डीकर (Meghana Bordikar) यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या जिंतूर व सेलू या पालिका जिंकण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. याशिवाय परभणी महापालिकेवर पुन्हा सत्ता मिळविण्यासाठीही त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेवर वरपुडकर यांचीच सत्ता होती. यांच्या कार्यकर्त्यांची ताकद, संघटन कौशल्य आणि अनुभव याचा भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्यासाठी विरोधकही सज्ज झाले आहेत. परभणीचे (Parbhani) आमदार डॉ. राहुल पाटील आणि खासदार संजय जाधव यांच्यासाठी महापालिकेची लढाई सोपी असणार नाही. सत्ता मिळविण्यासाठी त्यांना संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावे लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, परभणी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील निवडणूक म्हणजे केवळ सत्तेचा संघर्ष नसून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय दिशा ठरवणारा निर्णायक क्षणही ठरू शकतो.
पक्षनिहाय गटबाजी, अंतर्गत मतभेद, उमेदवारीचे पेच, स्थानिक प्रश्न यावरच निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. सत्ताधारी असो वा विरोधक जिल्ह्यातील ही निवडणूक प्रत्येक आमदारासाठी प्रतिष्ठेची असून यश मिळवण्यासाठी प्रत्येकालाच आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर, स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावावर, जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरावे लागणार आहे. आगामी काही आठवडे जिल्ह्यातील राजकारणाचे पारडे नेमके कुठे झुकते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
गंगाखेड सत्तासंघर्षाचे केंद्रबिंदू
गंगाखेड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गंगाखेड व पूर्णा या नगरपालिका, पालम नगर पंचायतीवर सत्ता मिळविणे हे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलच्या यशाची दिशा त्यांचे स्थानिक राजकारणातले भवितव्य ठरवू शकते. तर पाथरी विधानसभा क्षेत्रातील पाथरी, मानवत आणि सोनपेठ या नगरपालिका यावेळीही राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आमदार राजेश विटेकर यांच्यासाठी सोनपेठ ही त्यांच्या कार्यकर्तृत्वाची केंद्रबिंदू असलेली कर्मभूमी आहे, मात्र पाथरी व मानवत येथे सत्ता मिळविण्यासाठी त्यांना विरोधकांचा मजबूत मुकाबला करावा लागणार आहे.
1. परभणी महापालिका निवडणुका कधी होणार आहेत?
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
2. प्रमुख नेते कोण आहेत या निवडणुकीत?
मंत्री मेघना बोर्डीकर, खासदार संजय जाधव आणि माजी मंत्री बाबाजानी दुर्राणी हे तीन प्रमुख चेहरे आहेत.
3. परभणीतील सत्ताधारी पक्ष कोणता आहे?
सध्या परभणीत भाजप आणि शिंदे गटाचे प्रभाव वाढले असले तरी राष्ट्रवादी व शिवसेना देखील मजबूत आहेत.
4. या निवडणुकीत मुख्य मुद्दे कोणते आहेत?
विकास कामे, पाणीपुरवठा, शहरातील रस्ते आणि भ्रष्टाचाराचे आरोप हे प्रमुख मुद्दे आहेत.
5. निवडणुकीचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर काय होईल?
ही निवडणूक परभणी जिल्ह्यातील सत्तेचे आणि नेतृत्वाचे भविष्यातील चित्र ठरवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.