Parbhani News : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाने परभणी लोकसभेची जागा रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडली.आज उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः जानकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परभणीत आले होते. जानकरांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर बाहेरचा, उपरा उमेदवार अशी टीका केली जात आहे. अजित पवार यांनीही आजच्या आपल्या भाषणात महादेव जानकर इथे नवीन आहेत, असे म्हणत त्यांना विजयी करण्यासाठी सर्व हेवेदावे, मानपान विसरून कामाला लागावे, असे आवाहन पवार यांनी केले.
जानकर परभणीमध्ये नवीन असले तरी त्यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून रत्नाकर गुट्टे यांना निडवून आणले होते,याची आठवण देखील यावेळी अजित पवार यांनी करून दिली.महादेव जानकर यांचा परभणीतून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजित पवार उपस्थितीत होते. अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी महादेव जानकर यांना जिल्ह्याच्या विकासासाठी दिल्लीत पाठवा, असे आवाहन परभणीकरांना केले.देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. त्यांनी जगात देशाची मान उंचावली आहे, हे कोणीही नाकारणार नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देशाला आर्थिक विकासाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदी काम करतायेत.त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावेच लागेल, कारण त्यांनी पुढील दहा वर्षात देशाचा विकास करण्यासाठीची तयारी केलेली आहे.परभणीकरांनी आतापर्यंत निवडून दिलेल्या खासदाराने दहा वर्षात काय केले? अशी टीका अजित पवार यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांच्यावर नाव न घेता केली.
राष्ट्रवादीने परभणी मतदारसंघातून तयारी केली होती.परंतु महायुतीतील नेत्यांनी राज्याच्या व देशाच्या हिताच्या दृष्टीने काही निर्णय घेतले,त्याला पांठिबा म्हणून आपण ही जागा महादेव जानकरांना दिली असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. दिल्लीत तुमचे प्रश्न मांडून ते सोडवण्याची धमक ही जानकरांमध्ये आहे, त्यामुळे परभणी,परतूर, घनसावंगीच्या सर्व मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
ही निवडणुकी देशासाठी महत्वाची आहे, कुणाच्या घरचं हे लग्न नाही. त्यामुळे मला बोलावलं नाही, माझा फोटोच आला नाही, नावं घेतलं नाही अशा गोष्टींवरून रुसून बसू नका, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला. महादेव जानकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपचे बोर्डीकर,राहुल लोणीकर यांना त्यांचे नेते सांगतीलच,असे म्हणत अजित पवारांनी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अधिक सूचना करण्याचे टाळले.
Edited By : Chaitanya Machale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.