Parbhani News : महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरसभेत 'मेरे छोटे भाई' असा उल्लेख केला. एवढेच नाही तर जानकर यांना त्यांचे निवडणूक चिन्ह असलेली शिट्टी भेट म्हणून दिली. ती जानकरांनी व्यासपीठावरून वाजवली. आता परभणीकर जानकरांच्या विजयाची 'शिट्टी' वाजवतात का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर लोकसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून चर्चेत आले ते माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या घोषणेमुळे. सातारा, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघांत जानकर यांचा चांगला प्रभाव आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीमध्ये आपली ताकद दाखवली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जानकरांची माढ्यातील उमेदवारी डोकेदुखी ठरू शकते, याचा अंदाज आल्यामुळे त्यांना लांब ठेवण्याचे धोरण आखले गेले. पण जानकरांचा प्रभाव मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातही असल्यामुळे त्यांना तिकडे उमेदवारी देऊन थोपविण्याचे ठरले. पण केवळ उमेदवारी देऊन भागणार नाही, तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी महायुतीच्या नेत्यांना स्वीकारावी लागली. माढ्याचा आग्रह सोडा, परभणीतून लढा अशी ऑफर मिळाल्यामुळे जानकरांनी आग्रह सोडला आणि परभणीतून लढण्यास ते तयार झाले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीचे राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) व इतर नेते आवर्जून हजर होते. या वेळी झालेल्या सभेत फडणवीसांनी मी जानकरांसाठी मोदींचा संदेश घेऊन आलो आहे. मोदीजी तुमची लोकसभेत येण्याची वाट पाहात आहेत, असे जाहीरपणे सांगत फडणवीसांनी जानकरांची उमेदवारी महायुतीसाठी किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित केले.
त्यानंतर जानकरांच्या प्रचाराला परभणीत जो काही वेग आला तो विरोधकांना धडकी भरवणारा ठरत आहे. जानकर यांची थेट लढत महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांच्याशी आहे. दोन टर्म खासदार राहिल्यामुळे जाधव यांची मतदारसंघावर पकड आहे. या वेळी जाधव यांना भाजपची साथ नसली तरी आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसे पक्ष शरद पवार गट त्यांच्यासोबत आहेत.
शिवाय स्थानिक विरुद्ध बाहेरचा, मराठा विरुद्ध ओबीसी (OBC) असे वळण या निवडणुकीला लागले आहे. आज परभणीत पंतप्रधान मोदी यांनी जानकरांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत जानकरांचा उल्लेख त्यांनी मेरे छोटे भाई असा करत त्यांच्याबद्दलची आपुलकी, प्रेम व्यक्त केले. जानकरांना त्यांचे निवडणूक चिन्ह असलेली शिट्टी भेट दिली आणि ती जानकरांनी वाजवली.
एकूणच मोदी यांनी जानकरांची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, त्यामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्षांना जानकरांना निवडून आणण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावावी लागणार आहे. मोदींची विशेष कृपा असलेले जानकर निवडून आलेच पाहिजेत, याचे स्पष्ट संकेत पंतप्रधानांनी आजच्या सभेतून राज्यातील महायुतीच्या नेत्यांना दिले आहेत.
Edited By : Chaitanya Machale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.