Parbhani Political News : हायकमांडच पक्षात टिकेना, पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी जायचं तरी कुठे?

Congress Politics : परभणी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होतीये घालमेल; काय असू शकते त्यांची योजना?
Parbhani political news
Parbhani political newsSarkarnama
Published on
Updated on

Parbhani News : राज्यातील राजकीय क्षेत्रामध्ये मागील चार वर्षांत आमूलाग्र बदल झाले. अनेक नेत्यांना स्वतःची तसेच आपल्या उत्तराधिकाऱ्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता होती. त्यामुळे दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केले. हायकमांडच पक्ष सोडत असल्यामुळे संभ्रमात असलेल्या अनुयायांनी राजकीय भवितव्याचा विचार करून भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परभणी लोकसभा मतदारसंघात राजकीय नेते पक्षांतर करतील, असा अंदाज आहे. (Parbhani Political News)

मराठवाड्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. संपूर्ण मराठवाडा व विशेषतः नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात अशोक चव्हाण यांचा प्रभाव आहे. मात्र भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर राजकीय भवितव्य सुरक्षित असेल का? अशा चिंतेत असलेले नेते अन्य पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे जिल्ह्यातील नेते विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. अन्य पर्यायांमध्ये प्रथम क्रमांक सत्तेत नसलेल्या शिवसेना ठाकरे गटाचा आहे. परभणी जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाकडूनही हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परभणी विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल पाटील हे शिवसेना ठाकरे गटात आहेत.

गंगाखेड मधील आमदार रत्नाकर गुट्टे हे रासप मध्ये आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर भाजपच्या आहेत. तर पाथरी मधील आमदार सुरेश वरपुडकर हे काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला बळ मिळण्यासाठी पक्षात आणखी काही नेत्यांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच जिल्ह्यातील एका नेत्याने परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे जाहीर केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर (Mahadev Jankar) यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. पक्षप्रवेशासाठी विधानसभा निवडणुकीसाठी कमिटमेंट केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. कारण शिवसेना, भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार आहे.

प्रत्येक ठिकाणी तीनही पक्षात रस्सीखेच होणार हे स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती एकत्रित असून महायुतीचा उमेदवार विजयी होणार असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय नेते विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) गणित लक्षात घेऊनच नियोजन करत आहेत. तसेच परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचीही निवडणूक होणार आहे.

भाजपने अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता फोडल्यामुळे मराठवाड्यातील काँग्रेस नव्या नेत्याच्या शोधात आहे. मात्र त्यांना अशोक चव्हाण यांचा पर्याय अद्यापही सापडलेला नाही. लातूरच्या अमित देशमुख यांना काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी साद घातली असली तरी त्यांच्याकडून मात्र अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. अशावेळी पक्षात थांबावे की सत्ताधाऱ्यांशी जुळवून घ्यावे, अशा मनस्थितीत काँग्रेसचे जिल्ह्यातील व मराठवाड्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com