

Marathwada Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील 'चाणक्य' अशी ओळख असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी नवी उपाधी दिली. परळी येथे आयोजित 'महापशुधन' एक्स्पोला फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणाची चर्चा रंगली आहे. मतदारसंघातील मागण्या मान्य करून घेण्यासाठी मुंडे यांनी देवाभाऊंना चक्क 'कामधेनू'ची उपाधी दिली. सर्व इच्छा पूर्ण करणारी कामधेून आणि राजकारणात सध्या अडगळीत पडलेल्या धनंजय मुंडे यांच्या इच्छा 'कामधेून' देवाभाऊ खरचं पूर्ण करणार का? याची खमंग चर्चा बीडच्या राजकारणात सुरू झाली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवणही धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात काढली आणि त्यांच्याप्रती असलेले प्रेम, आदरभाव व्यक्त केला. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत आयोजित महा पशुधन एक्स्पो या प्रदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती महत्वाची मानली जात आहे. या निमित्ताने धनंजय मुंडे यांनाही फडणवीसांच्या जवळ जाण्याची संधी पुन्हा मिळाली. मंत्रीमंडळात घरवापसीसाठी प्रयत्नशील असलेल्या मुंडेंची ही इच्छा 'कामधेनू' पूर्ण करणार का? हा खरा प्रश्न आहे.
माझे वडील दिवंगत पंडित अण्णा मुंडे यांनी 1997 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष असताना परळीत प्रथम कृषी व पशुप्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा सुरू केली होती. कृषिमंत्री असताना मी राज्यातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आयोजित केले, तर पशुसंवर्धन मंत्री म्हणून त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पशुप्रदर्शन आयोजित करत ही परंपरा कायम ठेवली आहे. मात्र, या व्यासपीठावर आमचे नेते, अजितदादांची उणीव मनात दुःख उत्पन्न करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्री शिवरात्री निमित्त परळीत आलेले पाहुणे असल्याने त्यांना आज काही मागायचे नाही, असे ठरवले होते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या रुपाने प्रत्यक्ष कामधेनू आपल्या घरी आल्याची संधी मिळाली तर का सोडावी? म्हणून परळीच्या जनतेच्या काही जिव्हाळ्याच्या मागण्या करतो, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी टायमिंग साधले. मतदार संघातील विविध विकास कामे, प्रकल्प आणि योजना मार्गी लावण्याची मागणी करतानाच. लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे विभागीय कार्यालय तसेच पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता कार्यालय परळी येथून अन्यत्र हलवण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणातून अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणाने धनंजय मुंडे यांचे राजकीय आयुष्य धोक्यात आले. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधामुळे धनंजय मुंडे यांच्याभोवती संशयाचे जाळे निर्माण झाले होते. राज्य सरकारच्या प्रतिमेवर याचा परिणाम होत असल्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला आता सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरू आहे. यातील एक वगळता सर्व आरोपी जेलमध्ये आहेत. आपला या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही, असा दावा धनंजय मुंडे यांनी वारंवार केला. त्यानंतर राज्यात अशा काही राजकीय घडामोडी घडल्या की ज्यातून मुंडे यांच्या मंत्रीमंडळातील वापसीच्या चर्चाही सुरू झाल्या. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद गेल्यानंतर मुंडे आशावादी होते, पण त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले.
दुसऱ्यांदा माणिकराव कोकाटे यांच्यावर गंडांतर आले तेव्हाही धनंजय मुंडे यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण तिथेही भ्रमनिरास झाला. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर तर आता कोणत्याही क्षणी धनंजय मुंडे मंत्री होतील, अशी चर्चा राज्यभरात सुरू होती. पण तो योग काही आला नाही. अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर धनंजय मुंडे यांच्या सर्व आशा मावळल्या. परंतु सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या मोहिमेत धनंजय मुंडे हे आघाडीवर दिसले. तेव्हा त्याचा संबंधही मंत्रीमंडळात परतण्याचा प्रयत्न याच्याशी जोडला गेला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी धनंजय मुंडे यांचे राजकीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या मंत्रीमंडळात परतण्यापेक्षा त्यांच्यासाठी सरकारची प्रतिमा अधिक महत्वाची ठरते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना कितीही उपाधी दिली, तरी ही कामधेून त्यांना योग्य वेळ आल्याशिवाय प्रसन्न होणार नाही, एवढे मात्र निश्चित मानले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.