

Internal conflicts in BJP : मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव या ४ जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या एकूण २३१ गटांत व पंचायत समित्यांच्या ४६२ गणांत येत्या ७ फेब्रुवारीला मतदान होत आहे. त्यामुळे आघाड्या, युत्या, उमेदवारी अर्ज दाखल, अर्ज माघार, प्रत्यक्ष प्रचार असा टप्पा उलटून आता मतदानाचा दिवस उजाडला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुती व त्यातही भाजपने राज्यात व मराठवाड्यात मोठे यश मिळविले आहे. त्याचा परिणाम याही निवडणुकीत दिसेल. पण सध्या तरी सर्वच पक्ष बंडखोरीने त्रस्त झालेले असले तरी भाजपचा आत्मविश्वास मात्र दुणावलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या ६३ गट व पंचायत समितीच्या १२६ गणांसाठी निवडणूक होत आहे. गेल्या वेळच्या (२०१७) निवडणुकीत भाजप व शिवसेनेने सत्ता उपभोगली होती. यंदा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले झाल्याने चुरस वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षभरात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस युतीने प्रचंड मोठे यश मिळवले. खासदार व सर्व आमदार महायुतीचे जिंकून आले. नुकत्याच झालेल्या संभाजीनगर महापालिका निवडणुकीतही महायुतीतील भाजप व शिवसेना या दोन मित्रपक्षांनी एकमेकांविरूद्ध लढत विरोधकांचा अवकाशच संपवून टाकला.
भाजपला तब्बल ५७ तर शिवसेनेला १३ जागा मिळाल्या. आता जिल्हा परिषदेसाठी भाजप व शिवसेनेत महायुती झाल्याची घोषणा पालकमंत्री व शिवसेना नेते संजय सिरसाट व भाजप नेते व मंत्री अतुल सावे यांनी केली.
सिल्लोड तालुक्यात मैत्रीपूर्ण लढत वगळता सर्वत्र महायुती झाल्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक तालुक्यांत प्रबळ पक्षाने दुसऱ्या मित्रपक्षांवर कुरघोडी केली आहे. यात सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण प्रकार सिल्लोड तालुक्यात झाला आहे.
शिवसेनेचे माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड-सोयगाव हा बालेकिल्ला. या तालुक्यात त्यांनी महायुती तोडून टाकली आहे. युतीच्या चर्चांच्या आधीच त्यांनी तालुक्यात आपापल्या उमेदवाराना रसद पुरवून त्यांना बळ दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड यांनाच सत्तार यांनी आपल्याकडे ओढून राजीनामा देण्यास भाग पाडले. तसेच सिल्लोडच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत चिरंजीव समीर यांना निवडून आणले तर आता जिल्हा परिषद निवडणुकीत दुसरे चिरंजीव आमेर यांना अंभई या गटातून उतरविले आहे.
एकूणच सिल्लोड तालुक्यातील सर्व अकरा जागा जिंकून किंग मेकर बनण्याचा सत्तार यांचा प्रयत्न आहे. शिवाय तालुक्यात त्यांना प्रबळ विरोध हा महायुतीतील भाजपचाच असणार आहे. महाविकास आघाडीतील कॉँग्रेस, ठाकरे सेना व शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी या चारही पक्षांचे अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे खरी लढत सत्तार विरूद्ध भाजप अशीच असेल.
महायुतीची घोषणा होताच वैजापूर तालुक्यातील भाजपमध्येच असंतोषाचा भडका उडाला. तालुक्यात शिवसेना व भाजप या दोन मित्रपक्षांतून विस्तव जात नाही. त्यामुळे या तालुक्यातही दोन्ही पक्ष आमनेसामनेच असतील. तीच परिस्थिती पैठण व खुलताबाद तालुक्यातही. पैठण हा शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे व आमदार विलास खरात यांचा तालुका व बालेकिल्ला.
इथे भाजपचे तालुकाध्यक्ष दत्ता गोर्डे हे त्यांचे पारंपरिक विरोधक. पक्ष बदलून गोर्डे हे भाजपमध्ये आले असले तरी त्यांचे वैर हे भुमरे पिता-पुत्रांशी आहे. त्यामुळे शिवसेनेने तालुक्यातील सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर भाजपचे उमेदवारही उभे ठाकले आहेत. मात्र तरीही या मतभेदांचा परिणाम महायुतीवर होणार आहे.
मात्र या मतभेदांचा फायदा घेण्यासाठी प्रबळ असा विरोधी पक्ष नसल्याने या दोन्ही पक्षांनाच यश मिळण्याची शक्यता आहे. असेच कमी अधिक चित्र इतर तालुक्यांतही आहे. या बंडखोरीवर महायुतीतील वरिष्ठ नेते कशी मात करतात, यावर यश अवलंबून आहे.
लातूर जिल्हा परिषद यंदा कॉँग्रेस खेचणार का?
एकेकाळी कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक यंदा भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती व कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी यांच्यातच रंगेल, अशी शक्यता आहे. एकूण ५९ गट व पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ही लढत असून गेल्यावेळी भाजपने ३६ जागा जिंकून कॉँग्रेसच्या हातातून सत्ता हिसकावून घेतली होती.
नुकतीच झालेली महापालिका निवडणूक मात्र कॉँग्रेसने जिंकली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्याचे नेते दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवले. या वक्तव्याने लातूरकरांमध्ये आलेली सहानुभूतीची लाट व कॉँग्रेसचे नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत केलेल्या युतीने कॉँग्रेसला ही महापालिका जिंकणे सोपे गेले.
राज्यभर कॉँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागत असताना अमित देशमुख यांचा लातूर पॅटर्न अशीही या विजयाची (कॉँग्रेस-वंचित आघाडी) चर्चा होत आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेस जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी करत आहे. मात्र ही लढाई तेवढी सोपी नाही. जिल्ह्यात भाजपचे ३ व राष्ट्रवादीचे २ असे ५ आमदार महायुतीकडे आहेत.
तर अमित देशमुख हे केवळ एकच आमदार कॉँग्रेसकडे आहेत. ग्रामीण भागात भाजप व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तगडे नेटवर्क आहे. त्या तुलनेत आधी देशमुख,निलंगेकर व चाकूरकरांच्या काळात बळकट असलेली कॉँग्रेस आता कमकुवत झालेली आहे. भाजपमध्येही माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व औशाचे आमदार अभिमन्यू पाटील यांच्यात मतभेद आहेत. त्याचा परिणाम लोकसभा व नगर परिषदांच्या निवडणुकीत दिसला होता.
सध्या उदगीर तालुक्यात महायुतीसमोर (भाजप व राष्ट्रवादी) कॉँग्रेसचे तगडे आव्हान आहे. त्याशिवाय इतर राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार), दोन्ही शिवसेना हे पक्षही रिंगणार आहेत. गेल्यावेळी तालुक्यातील सातपैकी पाच जागा जिंकत भाजपने वरचढ ठरली होती. जिल्ह्यात आताही भाजप व राष्ट्रवादीच्या महायुतीचा वरचष्मा असला तरी उमेदवारी वाटपात बंडखोरी झाल्याने आव्हानाची स्थिती निर्माण झाली आहे.
निलंगा तालुक्यातही निष्ठावान पक्षकार्यकर्ते मागू पडून नवे धनदांडगे उमेदवार अचानक सर्वच पक्षांकडून पुढे येताना दिसत आहेत.निवडून येण्याची क्षमता व आर्थिक ताकद हेच दोन निकष राजकीय पक्ष समोर ठेवत असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांनी उपेक्षा होत आहे. चाकूर तालुक्यातही भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.
उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी विरोधी पक्षांत जाऊन तिकीटे पदरात पाडली आहेत. या तालुक्यात राष्ट्रवादीचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी भाजपला बाजूला वेठवत सर्वच जागी राष्ट्रवादीचे उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. म्हणजे जिल्हा स्तरावर महायुती अस्तित्वात असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती आलबेल नाही. मात्र महायुतीतील या बंडखोरीचा फायदा कॉँग्रेस किती व कशारितीने घेते हे बघणे महत्वाचे आहे.
धाराशिव : महायुतीत बंडखोरी; विरोधकांची झोळीही फाटकी
धाराशिव जिल्हा हा तसा कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसचा बोलेकिल्ला. माजी मंत्री सर्वश्री डॉ. पद्मसिंह पाटील, मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील अशा तगड्या राजकारण्याचा हा जिल्हा. आता डॉ.पाटील व बसवराज पाटील हे दोघे व मधुकररावांचे चिरंजीव सुनील चव्हाण हेही भाजपमध्ये गेले आहेत.
जिल्ह्यात तुळजापूर मधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील, परंड्यातून शिवसेनेचे तानाजी सावंत हे आमदार. तर महाविकास आघाडीकडेही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी अशी तगडी ताकद दोन्ही बाजूंकडे आहे. मात्र तरी देखील नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीतील यशानंतर व पक्षाच्या नेटवर्कच्या जोरावर भाजपचे पारडे जड मानले जाते.
मात्र महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांत इतकी फाटाफूट झाली आहे की नेमके कोण कुणाबरोबर हे समजणे अवघड झाले आहे. आरक्षणानेही हा संभ्रम वाढविला आहे. त्यामुळे आपापले बालेकिल्ले कोणत्याही पक्षांत जाऊन सुरक्षित ठेवणे प्रसंगी पक्षालाही धोबीपछाड देणे, असा प्रकार नेतेमंडळी करताना दिसत आहे.
सर्वात जास्त जागा असलेल्या धाराशिव तालुक्यात शिवसेना ठाकरे व भाजपमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे. भाजपनेते राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांच्या जवळचे नेते नेताजी पाटील व महेंद्र धुरगुडे यांना भाजपची उमेदवारी न देता मित्रपक्ष शिवसेनेची दिली आहे. म्हणजे आपल्या जागा तर पदरात पाडून घ्यायच्याच पण मित्रपक्षांतूनही आपलेच उमेदवार निवडून येतील याची दक्षता घ्यायची असाच हा प्रकार.
भाजपने राज्यभर आरपीआयच्या उमेदवारांना आपल्या चिन्हांवर निवडणूक लढवायला भाग पाडले होते. त्यापेक्षा हा निराळा प्रकार आहे. एकारितीने मित्रपक्ष संपवून टाकण्याची तर भाजपची खेळी नाही ना, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे असे नाही.
परभणी : ‘मविआ’ला महापालिका विजयाचा बुस्टर
परभणी जिल्हा परिषदेत नेहमीच कॉँग्रेस व राष्ट्रवादीचा बोलबाला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीचा परिणाम या जिल्ह्यातही झाला. रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपूडकर आदी दिग्गज नेते भाजपवासी झाले आहेत तर गंगाखेडचे राष्ट्रीय समाजपक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी भाजपसोबत नगरपरिषद व जिल्हा परिषदेत युती केली आहे.
इकडे विरोधी गोटात महापालिका ताब्यात आल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील हे खुश असले तरी जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीची मोट ते बांधू शकलेले नाहीत. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबतची चर्चा फिसकटली आहे.
महायुतीतील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार राजेश विटेकर यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारून कुणाबरोबरच युती केलेली नाही. कॉँग्रेसचीही तशीच भूमिका दिसत आहे.त्यामुळे राजकीय पक्षांच्या युत्या, आघाड्या फिसकटल्या असून सगळेच पक्ष स्वबळावर आपली ताकद अजमावत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.