उस्मानाबाद : सततचा, परतीचा आणि अतिवृष्टीच्या पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यास पीक विमा कंपन्या नेहमीच आढेवेढे घेतात. अगदी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही म्हटल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यासाठी मुहूर्तही निवडला तो म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजेच अभ्यंगस्नानाचा.
दिवाळीच्या धामधुमीत त्यांच्या या आंदोलनाकडे सरकारने फारसे लक्ष दिले नाही. पण दिवाळी संपली आणि कैलास पाटील (Mla Kailas Ghadge Patil) यांच्या आंदोलनाचा धसका सरकार घेऊ लागले असे दिसू लागले. उपोषणाच्या सहाव्या दिवशी जिल्ह्यात हिंसक घटना घडल्या. (Osmanabad) त्याचा संबंध आंदोलनाशी जोडला गेला, पण हा आम्हाला बदनाम करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे सांगत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तो हाणून पाडला.
उपोषणा दरम्यान प्रकृती खालावलेल्या आपल्या वडिल आणि काकाला भेटायला आलेल्या मुलगी आणि पुतणीमुळे आंदोलन स्थळावरली आंदोलन भारावले होते. पाटील यांचे आंदोलन हे खऱ्या अर्थाने पीक विमा कंपन्यांच्या विरोधात होते, त्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलल्याचा आरोप झाल्याने या आंदोलनाला धार आली. दिवाळीत सुरू असलेल्या या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यात देखील पाटील आणि त्यांच्या समर्थकांना यश आले.
विशेष म्हणजे राज्यात सततचा, परतीचा पाऊस आणि त्या आधी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी जाहीर केलेले सरकारी अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे सरकारच्या विरोधातला रोष कैलास पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने बाहेर आला. पाटील यांच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा तर मिळालाच पण याची धग राज्यभरात पोहचली. विमा कंपन्यांनी आधी पात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांची यादी हळूहळू वाढू लागली. आंदोलनाचा दिवस जसजसा पुढे जात होता, तसतशी या यादीतील पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढत होती.
उपोषण सुटेपर्यंत आधीच्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीत तब्बल १ लाख ८४ हजार नव्या शेतकऱ्यांचे नाव जोडले गेले होते. हेच या आंदोलनाचे खरे यश म्हणावे लागेल. पक्ष पातळीवर शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्र्यांना पत्र लिहून या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीक विमा मिळवून देण्याची मागणी केली.
पण हे आंदोलन जास्त काळ सुरू राहणे आमदार कैलास पाटलांच्या जीवावर बेतू शकते हे ओळखून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दखल घेतली आणि तुमच्या आंदोलनाला यश आले आहे, तुमच्यामुळे जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे, तेव्हा आता उपोषण पुरे, असा वडिलकीचा सल्ला आणि पक्षप्रमुख म्हणून आदेश दिला आणि सात दिवसांचे आंदोलन संपले.
या आंदोलनाचे खरे फलित काय तर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यानंतरही चालढकल करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना शरण यावे लागले. उपोषणापूर्वी कंपनीने १४ ऑक्टोबर रोजी १,६९,०८६ शेतकरी भरपाईस पात्र असल्याची यादी दिली. ती मान्य न केल्याने पुन्हा बदलून १,७९,७३८ शेतकरी पात्र असल्याचे कळवण्यात आले. त्यांची नियत साफ नसल्याचे लक्षात आल्याने आपल्या हक्कासाठी आंदोलन सुरू केले तेव्हा ३,५३,४९९ शेतकऱ्यांची यादी देण्यात आली. आता १,८४,४१३ शेतकरी वाढले. हेच आंदोलनाचे आणि शेतकऱ्यांचे एकजुटीचे यश म्हणावे लागेल.
योग्यवेळी हाती घेतलेल्या आंदोलनाने शेतकऱ्यांचा फायदा झाला अन् आमदार कैलास पाटील पुन्हा एकदा हिरो ठरले. राज्यातील सत्तातंराच्या वेळी सुरतला गेलेल्या आमदारांमध्ये कैलास पाटील यांचा समावेश होता. परंतु आपण कुठे चाललो आहोत याची कल्पना नसल्यामुळे ते गद्दार आमदारांसोबत निघाले होते. वाटेत सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर अगदी शिताफीने कैलास पाटील यांनी आपली सुटका करून घेत मुंबई गाठली होती.
हा सगळा प्रकार आणि कैलास पाटील यांनी दाखवलेली निष्ठा याची चर्चा तेव्हा राज्यभरात झाली होती. कैलास पाटील यांचे उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून कौतुकही केले. तेव्हा ५० खोके नाकारत शिवसेनेशी ईमान राखल्यामुळे ते हिरो ठरले होते. आता शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून दिल्याने पुन्हा एकदा त्यांची राज्यभरात चर्चा होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.