Neet Exam Case News : नीट पेपरफुटीचे प्रकरण चांगलेच तापले आहे. पेपर फुटल्यामुळे ती रद्द करून नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याच्या प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या आहेत. एमआयएमने या प्रकरणी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली आहे.
नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक येथे शनिवारी एमआयएम पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
नीट परीक्षेमुळे सुमारे 22 लाख विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबे प्रभावित झाली आहेत. विद्यार्थ्यांनी दोन ते तीन वर्षे कोचिंगसाठी लाखो रुपये खर्च केले, पालकांनी कर्ज काढून मुलांना शिक्षण दिले, परीक्षा संपल्यानंतर फिरायला जाण्याचे नियोजन केले. मात्र, पेपरफुटीमुळे त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले. विद्यार्थ्यांनी कोचिंग, ट्रेन, फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर केलेला खर्च सरकारने परत करावा, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी यावेळी केली.
विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्याऐवजी पंतप्रधान परदेश दौऱ्यांत व्यस्त आहेत. देशातील तरुणांना मिठी मारण्याऐवजी ते परदेशी शेखांना मिठी मारत आहेत, असा टोलाही त्यांनी पंतप्रधानांना लगावला. देशातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अशा गंभीर प्रकरणात पंतप्रधानांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांना धीर द्यायला हवा होता. देशातील 22 लाख विद्यार्थ्यांना दिल्लीला बोलावून त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. सरकारने जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे,’ असेही ते म्हणाले. हा विषय केवळ राजकारणाचा नसून देशातील तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.