Parbhani News : शिवसेना शिंदे गटाच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणात दोन्ही गटाकडून दररोज एक पाउल पुढे टाकले जात आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी नगर परिषदेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या दर्जाबाबत कार्यकारी अभियंता सावर्जनिक बांधकाम विभाग, परभणी यांना पत्र दिले आहे.
सईद खान (Saeed Khan) यांच्या प्रयत्नातून पाथरी शहरातील विविध विकासकामांसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यातील काही कामांना नुकतीच सुरुवातही झाली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) दुर्राणी यांनी ही सर्व कामे निविदा प्रक्रिया अंदाजपत्रकानुसार करण्यात याव्यात यासाठी २९ सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिले आहे. त्यावरुन आता परभणीतील राजकारण तापले आहे.
दुर्राणी यांनी पत्रात म्हटले, पाथरी शहरातील विविध विभागात 26 कामे करण्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरील कामे दर्जेदार व्हावीत व शासन नियमाप्रमाणे 15 वर्षापर्यंत याचा लाभ शहरवासियांना मिळावा यासाठी सदरील कामे निविदा प्रक्रियेत नमूद केल्याप्रमाणे होणे गरजेचे आहे. निविदा प्रक्रियेत नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार मशिनरीद्वारे कामे करण्यात यावीत व तसेच नमूद मशिनरी कंत्राटदाराच्या मालकीच्याच आहेत, याची खात्री करून घेण्यात यावी त्यात कोणताही बदल करण्यात येऊ नये. तसेच वरील कामाचा दर्जा राखण्यासाठी आपल्या स्तरावरून नियंत्रण करण्यात यावे.
मागील 25 वर्षाहून अधिक काळ पाथरी नगर परिषदेवर दुर्राणी यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे दुर्राणी यांनी निविदा प्रक्रियानुसार काम व्हावे व तसेच कामाचा दर्जा राखला जावा यासाठी सार्वजनिक बांधकाम अभियंत्यांना पत्र लिहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा प्रकार केवळ शिवसेना नेते सईद खान यांच्याशी असलेल्या राजकीय संघर्षातून असल्याचे सईद खान यांचे समर्थक बोलून दाखवतात.
पाथरी येथील साईबाबा जन्मभूमी विकास आराखड्याच्या मंजुरीनंतरही श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षात चढाओढ लागली होती. बाबाजानी दुर्राणी व सईद खान तसेच भाजपच्या नेत्यांनी दावे प्रतिदावे केले होते. दुर्राणी यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला असला तरी पाथरीत मात्र शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील संघर्ष पेटलेला दिसून येत आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.