Video Raj Thackeray : गोंधळ, घोषणाबाजी अन् तीन तासानंतर चर्चा; राज ठाकरे अन् मराठा आंदोलकांत काय झालं बोलणं?

Raj Thackeray On Maratha Reservation : आंदोलकांनी राज ठाकरे यांना आरक्षणप्रश्नी भूमिका विचारली. तेव्हा, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, याचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी केला.
raj thackeray
raj thackeray sarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले. राज ठाकरे धाराशिव येथे हॉटेलमध्ये पोहोचताच मराठा आंदोलकांनी तिथे जात गोंधळ घालत घोषणाबाजी केली.

धाराशिवमध्ये राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील करण्यात आलं. यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं.

हॉटेलमध्ये आंदोलकांनी तीन तास आंदोलन केलं. रात्री 9 वाजता 5 जण राज ठाकरे यांना भेटतील, असं ठरलं. इन कॅमेरा चर्चा झाली. आंदोलकांनी राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांना आरक्षणप्रश्नी भूमिका विचारली. तेव्हा, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, याचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी केला. सगळेजण तुम्हाला फसवत आहेत. हे जरांगे-पाटील यांनाही माहिती आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

मराठा आंदोलकांनी काय प्रश्न विचारले?

तुम्ही आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य केलं. पण, आत्तापर्यंत आरक्षणासाठी आमचे 400 बांधव मयत झाले आहेत. आण्णासाहेब पाटील यांच्यापासून आत्तापर्यंत अनेकांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत. आम्हाला कोण भडकवत नाही. आज आमचा समाज कोणत्या अवस्थेत जगतोय, आम्हाला माहिती आहे. अशा परिस्थितीत आरक्षणाची गरज नाही, असं वक्तव्य करणे चुकीचे होते. आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात? तुम्ही सध्या आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार आहात? अशा प्रश्नांचा भडीमार आंदोलकांनी राज ठाकरे यांना केला.

"...तर कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही"

यावर राज ठाकरे यांनी म्हटलं, "ज्यावेळेस मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) उपोषणाला बसले होते, तेव्हा मी तिथे गेलो होतो. मी त्यांना सांगितलं, 'तुम्ही जी मागणी करत आहात, ती पूर्ण होणार नाही. हे लोक ते होऊन देणार नाहीत. यांना फक्त तुमची माथी भडकावून संघर्ष घडवत मते मिळवायची आहेत. तुम्ही नंतर वाऱ्यावर गेलात तरी चालेल,' असं आहे. हे राज्य माझ्या हातात आलं, तर महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज पडणार नाही."

"महाराष्ट्रात कोण लोकसंख्या वाढवत आहे?"

"आपली मराठी मुले, मुले आणि शेतकऱ्यांवर सरकारचा पैसा खर्च व्हायला हवा. तो नको त्या गोष्टीवर खर्च केला जातो आहे. पूल बांधले जात आहेत. ते कोणासाठी बांधत आहात? महाराष्ट्रात कोण लोकसंख्या वाढवत आहे? जे पैसे महाराष्ट्रावर आणि तुमच्यावर खर्च व्हायला हवे. ते फक्त चार शहरांमध्ये खर्च होत आहेत. शहरातील लोकसंख्या वाढीमुळे पैसा तिथेच खर्च होतो. जो तुमच्यावर खर्च व्हायला हवा. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रातील लोकांना नोकरीसाठी घेणार नाही, असं म्हणतात. शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत, हेच माहिती नसते," असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

"महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही"

"आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत, हे आपल्या मुलांना माहिती नाही. नोकऱ्या महाराष्ट्रात असतात आणि जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये प्रसिद्ध केल्या जातात. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला सर्व अंदाज येईल. जरांगे-पाटलांनाही सर्व अंदाज येतील. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य आहे. इथल्या मुलांना शिक्षण आणि रोजगार याच्यासारख्या संधी कोठेच उपलब्ध होणार नाहीत. महाराष्ट्रात सर्वकाही आहे, त्यामुळेच बाहेरच्या राज्यातील लोक इथे येतात. तुमच्या तोंडाला पाने पुसतात आणि स्वार्थ साधतात त्यांच्यापासून सावध रहा," असा सल्ला राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com