औरंगाबाद : मला मारण्यासाठी विदेशात सुपारी देण्यात आली होती, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देतांना केला होता. यावर शिवसेनेने राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. (Shivsena) शिवसेनेचे आमदार जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी ज्यांना सुपारी घ्यायची, द्यायची सवय आहे, ज्यांना स्वप्नही तशीच पडतात ते नारायण राणे (Narayan Rane) हेच खरे सुपारीबाज आहेत, असा टोला लगावला आहे.
कोकणात खून, अपहरणाचे जे गुन्हे दाखल आहेत, त्यात कोणाची नावे समोर आली होती, हे या महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही, त्यामुळे राणेंना शिवसेनेवर टीका करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नसल्याचेही दानवे म्हणाले. (Maharashtra) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद या मुलाखतीनंतर आणखी वाढण्याची चिन्ह आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री नारायण राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिवसेना,उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. राणे यांनी आपल्याला संपवण्यासाठी विदेशातील लोकांना सुपारी देण्यात आल्याचा खबळबळजनक आरोपही केला.
यावर मुंबईत बोलतांना अंबादास दानवे यांनी राणेंच्या टीकेचा समाचार घेतला. दानवे म्हणाले, ज्यांनी सत्तेसाठी आपला स्वाभीमानी पक्ष गहाण ठेवला, नंतर काॅंग्रेस आणि आता भाजपमध्ये जाऊन मंत्रीपद मिळवले, त्या राणेंनी स्वाभीमानाच्या गप्पा मारू नयेत. भाजपने टाकलेल्या तुकड्यावर जगणाऱ्या नारायण राणेंवर आज जी वेळ आली आहे, ती कशामुळे याचा एकदा त्यांनी विचार करावा.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राणेंना या राज्याचे मुख्यमंत्री केले होते, त्या राणेंना देखील सत्ता आणि शिवसेनेवर वर्चस्व मिळवायचे होते, म्हणूनच ते बाहेर पडले होते. एका माजी मुख्यमंत्र्यांवर सत्ता आणि मंत्रीपदासाठी असे दारोदार फिरण्याची वेळ का? आली याचे आत्मचिंतन राणेंनी करावे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ताकदीने सांभाळली आणि वाढवली. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी केलेल्या कामाची दखल देशाने आणि जगाने घेतली.
राहिला प्रश्न हिंदुत्वाचा तर पहिले मंदीर, फिर सरकार हा नारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच राज्यातील गड-कोट, किल्यांच्या संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेतला, धार्मिक, पर्यंटनस्थळांना निधी देऊन त्यांचा विकास केला. महाराष्ट्रातील बारा ज्योतीर्लिंगांच्या विकासासाठी योजना आखली, ठाकरे आयोध्येत जाऊन आले. मग शिवसेने हिंदुत्व सोडले असे कसे म्हणता येईल? नारायण राणेंना अयोध्या देखील माहित आहे की नाही? असा टोला देखील दानवे यांनी यावेळी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.