

Parbhani Politics News : परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर चौदा वर्षानंतर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची निवड झाली. माजी अध्यक्ष सुरेश वरपूडकर पुन्हा इच्छूक असताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सूत्रं हलवली आणि वडीलांना अध्यक्ष पदावर बसवले.
विजयाच्या गुलालाची उधळण सुरू असतानाच मेघना बोर्डीकर यांनी ठेवलेल्या व्हाॅट्सअप स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. रामप्रसाद बोर्डीकर यांना अध्यक्ष करण्यासाठी पालकमंत्र्यांना बरेच कष्ट घ्यावे लागले, असे यातून स्पष्ट झाले. सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो, काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात' या त्यांच्या विधानातून पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्या याचा अंदाज येतो.
रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे स्वागत करणाऱ्या संचालकांच्या गर्दीत सुरेश वरपूडकर यांची अनुपस्थिति बरंच काही सांगून गेली. तर बोर्डीकरांच्या स्वागतासाठी हजर असलेल्या आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या स्टेट्सला उत्तर देणारी सविस्तर पोस्ट आपल्या सोशल मिडिया पेजवरून व्हायरल केली.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांची मारामार असताना मेघना बोर्डीकर यांनी रत्नाकर गुट्टे यांना मदत मागितली आणि अनेक आपले उमेदवार त्यांच्या नेतृत्वात मैदानात उतरवले. या मैत्रीची परतफेड महापालिका, जिल्हा परिषदेत करण्याचे ठरले होते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही रत्नाकर गुट्टे यांनी काही अपेक्षा व्यक्त केली होती, अशी चर्चा आहे. मात्र वडीलांना अध्यक्ष करण्यासाठी पालकमंत्र्यांनी यावर पाणी फेरले. वर स्टेट्समधून प्रतिस्पर्ध्यांना डिवचले.
यावर आता रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या पोस्टमधून निशाणा साधला आहे. अनुभवाचे बोल, असे म्हणत, जर तुमची नियत साफ असेल, तर नियती तुम्हाला कधीच हरू देत नाही!
वेळ जेव्हा परीक्षा घेते, तेव्हा ती फक्त संघर्षच देत नाही, तर ती माणसांच्या चेहऱ्यावरचे मुखवटेही काढून टाकते. आपल्यावर चांगला काळ असतो, तोपर्यंत अनेक जण आपले वाटतात.
आपुलकी दाखवतात, जवळ राहतात, साथ देण्याच्या गोष्टी करतात. पण कठीण प्रसंग आला की कोण खरोखर आपलं आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ होतं, याची खरी ओळख होते. गरज संपली की साथ सोडणाऱ्यांची नाती नसतात, तर ते फक्त व्यवहार असतात. गरजेपुरतं जवळ येणार्यांची नसतात कोणतीही नाती, वापर करून सोडणाऱ्यांच्या हाती शेवटी राखच येते!
पाठीमागे वार करून स्वतःला हुशार समजणारे लोक एक गोष्ट विसरतात की, नियतीच्या न्यायालयात प्रत्येक हिशोब चुकता होतो. म्हणून सूड बाळगू नका, राग धरू नका. फक्त शांतपणे पुढे चला. कारण कठीण काळात स्वार्थी लोक दूर जातात, पण काही मोजकी माणसं खंबीरपणे पाठीशी उभी राहतात.
त्यांना तुमच्या पदाशी, पैशाशी किंवा परिस्थितीशी काही देणंघेणं नसतं, तर त्यांना फक्त तुमच्याशी प्रेम असतं. परिस्थिती नसतानाही जे मनापासून साथ देतात, तेच खरे सखे असतात. बाकी सगळे सोयीचे प्रवासी असतात. वादळ कितीही मोठं असलं, हात न सोडणारी माणसंच पुन्हा नव्याने जगायला बळ देतात.
लक्षात ठेवा, वाईट वेळ आपल्याला संपवण्यासाठी येत नाही, तर ती आपल्याला वास्तव दाखवण्यासाठी येते. कोण कायमचं आपलं आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ होतं, याचा निवाडा संकटातच होतो. म्हणून संघर्षाला घाबरू नका. संकटं कायम राहत नाहीत. पण ती जाताना अनुभव, शहाणपण आणि माणसांची खरी ओळख देऊन जातात.
पाठीत वार करणाऱ्यांचा राग धरू नका. त्यांना शांतपणे आयुष्यातून वगळा. आणि जे कठीण काळातही तुमच्यासोबत उभे राहिले, त्यांच्याबद्दल कायम कृतज्ञ राहा. कारण एक गोष्ट अटळ आहे की, जर तुमची नियत साफ असेल, तर विजय शेवटी तुमचाच असतो, अशा शब्दात रत्नाकर गुट्टे यांनी परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीत नेमकं काय घडलं? हे सांगून टाकले आहे.
विशेष म्हणजे, रामप्रसाद बोर्डीकर यांची अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर रत्नाकर गुट्टे यांनी त्यांचे आनंदात स्वागत, अभिनंदन केले केले होते. तसेच लोकहिताच्या निर्णयांमध्ये संचालक म्हणून आपल्या सोबत असेन, अशी ग्वाही देखील दिली. त्यांची अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही त्यांच्या सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संघटनकौशल्य आणि सर्वसमावेशक नेतृत्वावर व्यक्त झालेला विश्वास आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या सहकार क्षेत्राला सक्षम दिशा देण्यासाठी दूरदृष्टी, पारदर्शकता आणि परिणामकारक निर्णयक्षमता आवश्यक असते. या सर्व गुणांचा समन्वय त्यांच्या नेतृत्वात निश्चितच दिसून येतो, अशा भावना गुट्टे यांनी व्यक्त केल्या आहेत. मात्र त्यानंतर केलेली त्यांची वरील पोस्ट सध्या जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.
मागील वीस वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत वरपूडकर व बोर्डीकर या नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. कधी बोर्डीकर तर कधी वरपूडकर यांनी आलटून-पालटून बँकेचे अध्यक्षपद भूषवले. या निवडणुकीतही सुरुवातीपासूनच सर्व नेत्यांची समन्वयाची भूमिका होती.
आमदार राजेश विटेकर, रत्नाकर गुट्टे हे त्यांच्या समर्थकांची वर्णी अध्यक्षपदी लागावी यासाठी प्रयत्नशील होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांनाही त्यांचा छुपा पाठिंबा होता. मात्र चर्चा यशस्वी झाली नाही व आठ जागांवर तडजोड न झाल्यामुळे निवडणूक घ्यावी लागली होती.
बोर्डीकर वरपूडकर यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले व अपरिहार्यतेतून आमदार राजेश विटेकर व आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होऊ दिली. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मेघना बोर्डीकर यांनी व्हाट्सअप स्टेटसद्वारे संदेश दिला. हा संदेश अप्रत्यक्षपणे विटेकर, गुट्टे यांना काढलेला चिमटा होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.