Parbhani Political News : सलग तीन वेळा निवडून येत लोकसभेच्या परभणी मतदारसंघात खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी एक नवा विक्रम केला. राज्यात आणि विशेषत: परभणी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जातीयवादाच्या वळणावर गेली असताना जाधव यांनी प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यावर मोठा विजय मिळवला. राज्यात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर परभणीत ठाकरे गटाला मिळालेला हा विजय महत्वाचा समजला जातो.
संसदेच्या पहिल्या अधिवेशनात संजय जाधव यांनी मराठीतून शपथ घेत हॅट्रीक साधली. पद आणि गोपनियतेची शपथ घेताना त्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील जनतेला एक वचन दिले. ते म्हणजे मतदारसंघाच्या मातीशी प्रामाणिक असण्याबद्दलची वचनबद्धता. खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर संजय जाधव यांनी मतदारंसघातील जनतेचे आभार मानणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
संसदेत तिसऱ्यांदा खासदारपदाची शपथ घेताना आनंद होत आहे. आजवर केलेली जनसेवा, लोककार्याला स्मरून ही शपथ घेतली. ही वचनबद्धता परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मातीशी प्रामाणिक असण्याची आहे. ज्यांच्यामुळे ही शपथ सलग तिसऱ्यांदा घेता आली, त्या आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, अशा शब्दात जाधव यांनी मतदारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
संजय जाधव यांच्यासाठी परभणी लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणे यावेळी प्रतिष्ठेचे बनले होते. आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष, शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्ष आणि पक्ष नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर मिळालेली उमेदवारी या पार्श्वभूमीवर जाधव आणि शिवसेना ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
महायुतीने संजय जाधव यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. रासपकडून निवडणूक लढवत असलेल्या महादेव जानकरांना महायुतीने विशेषतःभाजपने बळ दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीत जानकरांसाठी सभा घेऊन त्यांच्या विजयासाठी शिट्टी वाजवली. पण स्थानिक विरुद्ध बाहेरचा, मराठा विरुद्ध ओबीसी असे स्वरूप या निवडणुकीला आले आणि वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने झुकले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असून संजय जाधव यांचा फक्त 42 हजार मतांच्या फरकाने विजय झाला होता. यावेळी मात्र महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी हे तीन घटक पक्ष, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर स्वतः उमेदवार असल्याने ओबीसी समाजाची एकगठ्ठा मते त्यांच्या बाजूने वळली, अशा परिस्थितीत संजय जाधव यांनी तब्बल 1 लाख 34 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवत हॅट्रीक साधली. आज संसदेत सलग तिसऱ्यांदा शपथ घेताना या सगळ्या घडामोडी संजय जाधव यांच्या डोळ्यासमोरून निश्चितच गेल्या असणार.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.