
Shivsena-Aimim News : शेंद्रा एमआयडीसीतील भुखंड प्रकरणात चुकीची माहिती देऊन बदनामी केल्याप्रकरणी राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात फौजदारी दावा दाखल केला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात दाखल या दाव्यावर 24 जून रोजी सुनावणी होणार आहे.
मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची दोन मुले सिद्धांत, तुषार आणि पत्नी विजया शिरसाट यांच्या नावे शेंद्रा एमआयडीसीमध्ये एक भूखंड खरेदी करण्यात आला आहे. सदर भुखंड हा ट्रक टर्मिनलसाठी राखीव असताना तो शिरसाट यांच्या कुटुंबियांना बेकायदेशीररित्या विकण्यात आल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या प्रकरणाशी मंत्री संजय शिरसाट यांचा कुठलाही संबंध नसताना त्यांची बदनामी करण्यात आल्याचा ठपका ठेवत अॅड. राजेश काळे यांच्या मार्फत संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्या विरोधात फौजदारी दावा दाखल केला.
अॅड.काळे यांनी दिलेल्या माहितीनूसार संजय शिरसाट यांच्या वतीने 13 जून रोजी फौजदारी दावा दाखल केला आहे. आज न्यायाधीश सुट्टीवर असल्याने पुढील सुनावणी 24 रोजी होणार आहे. या दाव्यात दोन वर्ष शिक्षेची तरतूद आहे. 5 जून रोजी संजय शिरसाट यांच्या विरुद्ध इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या संदर्भात दाखल फौजदारी दाव्याची नोटीस मी इम्तियाज जलील यांना व्हॉट्सॲपला पाठवली असल्याचे काळे यांनी सांगीतले.
इम्तियाज जलील यांच्या अनेक प्रकरणात मी त्यांचा वकील होतो. परंतु आता मी त्यांचा वकील नाही, त्यामुळे त्यांचे खटले चालवू शकणार नसल्याचेही अॅड. काळे यांनी स्पष्ट केले. मी संजय शिरसाट यांच्या बायकोचा भाऊ असल्याचेही ते म्हणाले. इम्तियाज जलील यांनी 5 जून रोज पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेत चरित्रहनन करणारे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बातमी झाली यातून संजय शिरसाट यांची बदनामी झाली. लोकांची त्यांच्याबद्दल असलेली मते बदलली, याला इम्तियाज जलील जबाबदार आहेत. पालकमंत्र्यांच्या मुलाच्या घशात घातली ट्रक टर्मिनलची जागा हे वक्तव्य बदनामी करणारं आहे. संजय शिरसाट यांचा काहीही संबंध नसताना हे करण्यात आले.
सिद्धांत शिरसाट, विजया शिरसाट यांनी शेंद्रा एमआयडीसीमध्ये रीतसर जागा मागितली. नियमानुसार त्यांना प्लॉट मिळाला. सिद्धांत शिरसाट, विजया शिरसाट यांनी प्लॉट मागितला होता, संजय शिरसाट यांनी मागणी केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाशी संजय शिरसाट यांचा संबंध नाही. जागेचा उद्देश बदल करून प्लाॅट मिळवा यासाठी संबंधितानी विनंती केली होती. त्यानुसार एमआयडीसीने बदल करून दिला. यामध्ये कुठेही संजय शिरसाट यांचा संबंध नाही. हे प्रकरण क्रिमिनल असल्याने यात शिक्षेची तरतूद आहे. या संदर्भात संजय शिरसाट यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अॅड. राजेश काळे यांनी सांगितले.
ही केस एमआयडीसी प्रकरणासंदर्भात केलेली आहे. दुसऱ्या प्रकरणातही केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले. इम्तियाज जलील यांनी जी बदनामी केली याबाबत कठोरात कठोर कारवाई झाली पाहजे. सहाजापूर प्रकरणात देखील संजय शिरसाट यांचा संबंध नाही, असे सांगतानाच पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी 7-8 वेळा 'हरिजन' शब्द वापरला. त्या दिवशी त्याचे हावभाव आणि उद्देश स्पष्ट होता. कागदावर वाचून बोललो अस ते म्हणत आहेत, मात्र बोलत असताना त्यांच्या हातात कागद नव्हता. त्यांच्या हातात मोबाईल होता, कागदावर असलेलं वाचण्याला बंदी नाही. मात्र बोलण्यावर बंदी असल्याचे अॅड. काळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.