

Nashik TCS Case News : नाशिकमधील टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे. फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय मिळवून देण्यात त्यांचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या प्रकरणी इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. इम्तियाज जलील हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा दावा शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला.
टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथील नारेगाव भागातील एका घरात आश्रय देण्यात आला होता. ती आपल्या आई-वडीलांसह तिथे राहत होती. ज्या घरातून नाशिक पोलीसांच्या टीमने निदा खानला अटक केली ते घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे होते. या प्रकरणात इम्तियाज जलील यांचे नाव संजय शिरसाट यांनी घेतले होते.
नाशिक पोलिसांनी यापूर्वी दाखल गुन्ह्यात जलील यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाने (SIT) त्यांच्या कथित भूमिकेबाबत न्यायालयालाही माहिती दिली आहे. नाशिकमधील TCS कंपनीच्या बीपीओ विभागात महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ, मानसिक त्रास आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे आरोप समोर आले होते. इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकारण तापले आहे. संजय शिरसाट यांनी 'मी सांगत होतो, इम्तियाज जलीलच निदा खान प्रकरणाती मुख्य आरोपी आहे', त्याला जेलमध्ये जावे लागेल याचा पुनरुच्चार शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होताच केला.
शिरसाट म्हणाले, "नाशिकमध्ये घडलेल्या टीसीएस धर्मांतराच्या प्रश्नावर जो तपास पोलीस आयुक्तांनी केला तो आता खऱ्या अर्थाने ट्रॅकवर आला आहे. निदा खानला नाशिकमधून मुंब्रा येथे पळवून नेण्यात आले, तिथून संभाजीनगरला आणणे आणि तिच्यासह सर्व नातेवाईक पस्तीस दिवस या ठिकाणी राहिले. यासाठी ज्याने सपोर्ट केला तो इम्तियाज जलील आहे. तोच या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे".
"नगरसेवक मतीन पटेल हा त्यातला फक्त मोहरा होता.इम्तियाज जलील याने केलेले हे कारस्थान आहे. म्हणून पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता त्याला जेलमध्ये जावे लागेल अशी परिस्थिती आहे. धर्मांतर करण्यासाठी जे षडयंत्र फक्त नाशिकपुरते नाही तर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील काही भागात रचले गेले, त्यासाठी टोळ्या कार्यरत होत्या", असा आरोपही संजय शिरसाट यांनी केला आहे.
टीसीएस कंपनीतील काही कर्मचाऱ्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल केल्यानंतर मार्च २०२६ मध्ये हे प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण, लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतरासाठी कथित दबाव आणणे अशा स्वरूपाचे आरोप आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी एकूण नऊ एफआयआर दाखल केले. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी निदा खान ही अटक टाळण्यासाठी फरार होती. तिचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते.
दरम्यान, निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ७ मे २०२६ रोजी नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने नारेगाव-कौसर पार्क परिसरातील एका घरातून तिला अटक केली.या घरात निदा खानसोबत तिचे कुटुंबीयही असल्याचे पोलिसांनी सांगितले. एमआयएमचे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना आश्रय दिल्याचा आरोप पोलिसांनी केला. निदाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतरही तिला आश्रय देऊन कायदेशीर प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप पटेल यांच्यावर ठेवण्यात आला.
निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीदरम्यान निदा खान कुठे आहे?, तिला कोणी मदत केली?, याबाबत विचारणा केली असता पटेल यांनी वारंवार इम्तियाज जलील यांचे नाव घेतल्याचे तपासातील कागदपत्रांमध्ये नमूद आहे. या संदर्भात पोलिसांनी मतीन पटेल यांच्या मोबाईलमधील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासले आहे. निदा खान फरार असताना कोणाकोणाच्या संपर्कात होती, याचा तपास करण्यात आला. मतीन पटेल आणि इम्तियाज जलील यांच्यातील कथित संभाषण तपासले जात आहे. इम्तियाज यांच्या आवाजाचे नमुने घेऊन ऑडिओ रेकॉर्डिंगशी पडताळणी करण्यात आल्याचेही एका दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे. यापूर्वी दाखल केलेल्या आरोपपत्रात जलील यांचे नाव आले होते, मात्र त्यावेळी त्यांना आरोपी करण्यात आले नव्हते. आता ६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी त्यांना आरोपी म्हणून समाविष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.