Maharashtra Cabinet Expansion News : राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे विराजमान झाले. त्यांच्यासोबत मोजक्या मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर साधरणतः वर्षभराने अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह सत्तेत सहभागी झाले. तेव्हा फक्त त्यांच्या समर्थक काही आमदारांचा शपथविधी पार पडला. शिवसेना शिंदे गटातील काही मंत्र्यांची खाती बदलली गेली.
तेव्हापासून तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची वाट पाहणाऱ्या आणि त्यात आपली वर्णी लागेल या आशेवर असलेल्या युतीच्या आमदारांचा पुन्हा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे चार महिने राहिलेले असताना आता मंत्रिमंडळ विस्तार नको, असे भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना सांगितले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेवर शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट(Sanjay Shirsat) हे व्यक्त झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात झालेल्या बंडामध्ये संजय शिरसाट यांची भूमिका महत्वाची होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट पत्र लिहित पहिल्यापासून शिरसाट यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
त्यामुळे सत्तांतरानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपली वर्णी लागेल अशी आशा शिरसाट बाळगून होते. पण महाविकास आघाडीमध्ये आधीच मंत्री असलेल्या संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार(Abdul Sattar) या दोघांना संधी दिल्यामुळे संजय शिरसाट यांना थांबण्यास सांगण्यात आले होते. तेव्हापासून आजतागायत शिरसाट व शिवसेनेचे अनेक मंत्रीपदासाठी इच्छूक असलेले आमदार मंत्रीमंडळ विस्ताराची वाट पाहत आहे. अनेकदा या आमदारांची विरोधकांकडून खिल्ली उडवली जाते.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या चार महिने आधीच झाला होता. यावेळी भाजपमधील अनेकांना राज्यमंत्री पद मिळाले होते. काही महिन्यांसाठी का होईना नावा मागे मंत्री लागल्यामुळे अनेक आमदारांनी समाधान व्यक्त केले होते. संभाजीनगर पुर्वचे भाजप आमदार अतुल सावे यांना तेव्हा राज्यमंत्री करण्यात आले होते.
2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सावे यांना कॅबिनेट पदी बढती देण्यात आली. आता 2024 च्या विधानसभा निवडणुका चार महिन्यावर आल्या आहेत. मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही? याबद्दल ठामपणे ना मुख्यमंत्री काही बोलत आहेत, ना दोन्ही उपमुख्यमंत्री.
त्यात दिल्लीतून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला रेड सिग्नल दाखवला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही तर अनेक आमदार नाराज होतील, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे. अर्थात यात शिरसाट यांचा क्रमांक वरचा असेल हे वेगळे सांगायला नको.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.