

Chhatrapati Sambhajinagar News, 22 May : 'एसआयआर'चा विषय सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी आणि तुमच्या आमच्या भवितव्यासाठी यावर लक्ष देणे खूप गरजेचे आहे. हैदराबादहून ओवेसी या शहरात येतो काय? आपल्या कार्यकर्त्यांना अॅप देऊन एसआयआरची माहिती दिली जाते, त्यांची कार्यशाळा होऊन ते कामालाही लागतात? मग असे काम आपल्यालाल का जमत नाही? असा सवाल पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एसआयआर संदर्भात बैठक आणि आगामी विधान परिषद निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक कामचा आढावा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी एसआयआरच्या विषयावर एमआयएमने केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यांची लोक मोठ्या प्रमाणात नोंदणी करत आहेत, त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत, आपण मात्र काहीच करायला तयार नाही, अशी खंत शिरसाट यांनी व्यक्त केली.
हैदराबादहून ओवेसी शहरात आला, त्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी एसआयआरबद्दल कार्यशाळा घेऊन त्यांना कामाला लावले. भाजपच्या संघटनात्मक कामाकडे पहा. त्यांचा कोणताही कार्यकर्ता भेटला की तो म्हणतो, आमच्या मागे पक्षाने खूप कामे लावली आहेत. या पक्षाच्या दीडशेहून अधिक वेगवेगळ्या विंग पक्षासाठी काम करतात. आपण मात्र गाफील आहोत. विधानसभा निवडणुकीत अतुल सावे, प्रदीप जैस्वाल हे किती मतांनी निवडून आले? याकडे लक्ष द्या.
कोणी दोन हजार, कोणी सहा-आठ हजार मतांच्या फरकाने निवडून आला आहे. आपण त्यातच खूष आहोत, पण हे अंतर कमी व्हायला वेळ लागणार नाही. ज्या पद्धतीने ते कामाला लागले आहेत, त्यापेक्षा कितीतरी वेगाने आपल्याला कामाला लागावे लागेल, तर आपण राजकारणात टिकू शकू. जिल्हाधिकारी कार्यालयात एसआयआरच्या याद्या तयार करण्याचे कंत्राट 80 टक्के कमी दराने कसे घेतले जाते? ते घेणारे कोण? याकडे बारकाईने लक्ष द्या, असे आवाहन शिरसाट यांनी उपस्थितांना केले.
महापालिकेत महापौर राजेंद्र जंजाळ आणि आपल्या नगरसेवकांनी आता आक्रमक झालं पाहिजे. एमआयएमच्या नगरसेवकांच्या अतिक्रमणांची यादी काढा, निश्चितच त्यांचे अतिक्रमण आपल्या नगरसेवकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. कोणाचाही मुलाहिजा न बाळगात ते पाडा. राजेंद्र जंजाळ यांनी संघटनात्मक बांधणीसाठी आता कार्यकर्त्यांची व्हिसी घ्यायला सुरूवात करावी, अशी सूचनाही संजय शिरसाट यांनी केली. एसआयआरचा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल.
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत 93 लाख नावे वगळण्यात आली. तेव्हा मतदानाचा टक्का तिथे वाढला. जी नावे वगळली ती कोणाची होती? हे वेगळं सांगण्याची गरज नाही. माझ्या पश्चिम मतदारसंघात काही भाग असा आहे जिथे लोकसंख्या पंधरा हजार आणि मतदार संख्या 13-14 हजार असते. हे कसे शक्य आहे, हे सगळं मतदान आपल्याविरोधातले असते. बोगस याद्या तयार करून आधार कार्ड, मतदान कार्ड मिळवले जाते, मग त्यांना विरोध कसा करणार? असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.