

Shivsena-BJP News : युतीमध्ये जालना-संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2018 मध्ये अंबादास दानवे हे रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून आले होते. आता पक्षात फूट पडली असली आणि दोन्ही जिल्ह्यांमध्ये भाजपाची ताकद वाढली असली तरी शिवसेना हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत सोडायला तयार नाही.
जालना, छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सत्ता, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये वर्चस्व, संभाजीनगर जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सगळी महत्त्वाची पदे भाजपाकडे असल्याने त्यांनी यावेळी ही जागा आम्ही लढवणार, असा सूर लावला आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मात्र ही जागा शिवसेनेची होती, आहे आणि राहणार असे ठणकावून सांगितले आहे.
भाजपाने या मतदारसंघावर दावा केला असला तरी ही जागा सोडणे शक्य नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही आम्ही आमच्या भावना बैठकीच्या माध्यमातून सांगणार आहोत. अंतिम निर्णय महायुतीचे नेते एकत्र बसून घेतील, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आमचाही अनेक जागांवर दावा आहे. पण या संदर्भात तीनही पक्षांचे प्रमुख नेते निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.
कोणी कोणत्या जागा लढाव्यात याचा प्रस्ताव आम्ही भाजपाकडे दिलेला आहे. अनेक भागात आमची संघटनात्मक ताकद वाढलेली आहे. शेवटी महायुती म्हणून आम्ही विधान परिषदेच्या सर्व सतरा जागा लढवणार आहोत. या सर्व जागा महायुती जिंकेल, असा दावाही सामंत यांनी केला. मराठवाड्यातील जालना-छत्रपती संभाजीनगर, बीड-लातूर-धाराशीव, नांदडे, परभणी-हिंगोली या चार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक होत आहे.
राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या तीनही पक्षांनी मराठवाड्यात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने दावेदारी सुरू केली आहे. परभणी-हिंगोलीची जागा गेल्यावेळी शिवसेनेने लढवून विप्लव बजोरिया यांनी जिंकली होती. धाराशीव-लातूर-बीडमध्ये भाजपाचे सुरेश धस यांनी बाजी मारली होती. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात शिवसेनेचे अंबादास दानवे हे निवडून आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.