

महापालिका निवडणूक जाहीर होताच छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापले आहे.
इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळल्याच्या व्हायरल व्हिडिओवरून संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.
व्हिट्स हॉटेल चौकशीवर अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त केल्यानंतर शिरसाट यांनी त्यांच्यावर ‘दलाली’चा आरोप केला आहे.
chhatrapati sambhaji nagar : यागेश पायघन
महापालिका निवडणुक जाहीर झाली तसे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावर एका कार्यक्रमात नोटा उधळण्यात आल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. यावरून संजय शिरसाट यांनी इम्तियाज यांच्यावर तोफ डागलीय. तर व्हिट्स हॉटेल खरेदी-विक्री प्रक्रियेची चौकशी त्याच विभागातील अधिकाऱ्यांकडे सोपवल्याने अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. यावरही जोरदार टीका करताना अंबादास दानवे दलाली करतात, असा आरोप करत संजय शिरसाट अक्षरशः तुटून पडले आहेत.
संजय शिरसाट राज्यात मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून त्यांची अनेक प्रकरण एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी बाहेर काढली होती. व्हिट्स हॉटेल खरेदी, एमआयडीसीतील भुखंड, शहरातील मोक्याच्या जागेवरील प्लॉट खरेदी, गायरान जमीनीचे प्रकरण, घरात नोटांची बॅग आणि महापालिकेतील घरकुल व इतर योजनांमधील घोटाळ्याचे आरोप सातत्याने माध्यमांसमोर करण्यात आले.
महापालिका निवडणुकीचा रंग आता चढू लागल्याने आरोप-प्रत्यारोपांनाही धार येऊ लागली आहे. इम्तियाज जलील यांच्या पाचशे, शंभरच्या नोटा एका कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांकडून उधळण्यात आल्या. यावर शिरसाट यांनी टीका करतातना इम्तियाज जलील किंवा औवेसी ही हैदराबादची पिलावळ आहेत. नोटा उधळने हा तुमचा छंद आहे का? दलाली करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे तुमचे छंद आहेत, अशा शब्दात शिरसाट यांनी एमआयएमवर हल्ला चढवला.
स्वाभिमानी मुस्लिम तुमच्यासोबत कधीही राहणार नाही, आता हैदराबादला जा, लोकांनी तुम्हाला सगळीकडून बाद केले आहे. नोटा उधळणे हा गुन्हा असून इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे आपण पोलीस आयुक्तांना सांगणार असल्याचे शिरसाट म्हणाले. नवाबी घरातून आल्याचा अविर्भाव त्यांच्या रक्तात आहे. तुम्ही गुलाम, आम्ही नवाब, ही त्यांची हुकुमशाही पद्धतीची रचना आहे. सर्वांनी आमचा जय जयकार करावा असे त्यांना वाटते, ही त्यांची मस्ती आहे. तुम्ही नवाब होतात तर पुण्यात 17 वर्षे गुलामगिरी का करत होतात? तुमची मस्ती लोकांनी आता पाहिली आहे. म्हणूनच लोकांनी तुम्हाला सगळीकडून बाद केलेय. नोटा उधळणे गुन्हा असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे याचा पुनरुच्चारही शिरसाट यांनी केला.
उंटावर बसून शेळ्या हाकू नका
व्हिट्स हॉलेट प्रकरणात हाय पॉवर कमिटी संदर्भात अंबादास दानवे यांनी ट्वीट करून बाहेरील जिल्ह्यातील लोक चौकशी समितीत नेमण्याची मागणी केली. त्यावर 'सुप्रिम कोर्टाच्या न्यायधिशांना नेमा, राष्ट्रपतीला नेमा, सुप्रीम कोर्टाला नेमा, काहीही माहिती नाही, अकलीचा तुमचा काहीही संबंध नाही. माहिती घेऊन बोला, उंटावर बसून शेळ्या हाकू नका. अर्धा किलोमीटरवर न्यायालय आहे. रिट दाखल करा. ट्विट करणारे आता थकलेत', असा टोलाही शिरसाट यांनी अंबादास दानवे यांना लगावला.
पैसे घेवून उमेदवारी देणारे यांना विचारा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे कुणाच्या मतावर निवडून आले? दलाली करणारे तुम्ही, सभा घ्यायलाही तुम्ही पैसे घेता, हे लपलेले नाही. तुमचा बाजार आता उठायला लागला आहे, अशी टीकाही शिरसाट यांनी इ्म्तियाज जलील, अंबादास दानवे यांच्यावर केली.
युती होणार!
शिवसेनेचे दोन तुकडे झाल्याने त्यांची ताकद कमी झाल्याचा भाजपकडून दावा केला जात आहे. यावर आमची ताकद घटली असेल, त्यांची वाढली असेल मात्र असे वक्तव्य करणे टाळले पाहिजे. आमचा इथे खासदार आहे, तरीही आम्ही म्हणतो आमची ताकद कमी झाली. पण, भाजपशी युती करणे हे आमचे ध्येय आहे. सर्वसामान्य माणसाला महायुतीला मतदान करायचे असल्याने आमची महायुती होणार आहे. युतीवर परीणाम होईल अशी वक्तव्ये कुणी करू नयेत, असे आवाहनही शिरसाट यांनी केले.
1. संभाजीनगरमध्ये राजकीय वाद का पेटला आहे?
➡️ महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
2. इम्तियाज जलील यांच्यावर नेमका काय आरोप आहे?
➡️ एका कार्यक्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
3. अंबादास दानवे यांनी कोणता मुद्दा उपस्थित केला?
➡️ व्हिट्स हॉटेल खरेदी-विक्री चौकशी त्याच विभागातील अधिकाऱ्यांकडे दिल्याबाबत त्यांनी संशय व्यक्त केला.
4. संजय शिरसाट यांची भूमिका काय आहे?
➡️ त्यांनी इम्तियाज जलील व अंबादास दानवे यांच्यावर जोरदार टीका करत आरोप केले आहेत.
5. या वादाचा निवडणुकीवर परिणाम होईल का?
➡️ आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक चुरशीचे होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.