Shivsena BJP News : राजकारणात कायम कोणी कोणाचा शत्रू आणि मित्र नसतो असं नेहमी म्हटलं जातं. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी एकमेकांचे वस्त्रहरण केले. कोकणात शिंदेच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यातील खंडाजंगी राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. तर इकडे मराठवाड्यातील हिंगोलीत भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे आणि शिवसेनेचे संतोष बांगर यांनी एकमेकांची अंडी पिल्ली बाहेर काढण्यात कुठलीच कसर ठेवली नव्हती.
या सगळ्या राजकीय नाट्याला आठवडा उलटत नाही तो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात एकमेकांना शिव्या घालणारे हे नेते चक्क गळ्यात गळे घालून फिरताना दिसले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निलेश राणे- रविंद्र चव्हाण यांच्यात दिलजमाई झाल्याचे दिसून आले. निलेश राणे यांनी चव्हाण यांना ते आपल्या मोठ्या भावासारखे असल्याचे म्हणत नगरपालिका निवडणुकीतील वादावर पडदा टाकला.
तर दुसरीकडे हिंगोलीत कलंक, व्हिडिओ क्लीप, मटका, जुगार, वाळुमाफिया, गुंडगिरीचे एकमेकांवर आरोप करत धुराळा उडवून देणारे आमदार तान्हाजी मुटकुळे आणि संतोष बांगर हे ही विधीमंडळाच्या सभागृहात एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवत हसऱ्या चेहऱ्याने फोटोसाठी पोझ देत होते. हिंगोली नगरपालिका निवडणुकीतील प्रचार हा मुटकुळे-बांगर यांनी वैयक्कित पातळीवर नेला होता. हिंगोली नगराध्यक्षपदासाठी आमदार संतोष बांगर यांच्या भावजय उमेदवार आहेत.
इथे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटत बांगर यांच्यामुळे हिंगोलीत अवैध धंदे, मटका, जुगार, वाळु तस्करी, गुंडागर्दी वाढल्याचा आरोप केला हातो. बांगर आणि त्यांच्या समर्थकांमुळेच हिंगोली शहराचे चित्र बिघडले असूने बांगर हे हिंगोलीला लागलेला कंलक आहे, असा हल्ला मुटकुळे यांनी त्यांच्यावर चढवला होता. याला बांगर यांनीही आपल्या स्टाईलने प्रत्युत्तर देत व्हिडिओ क्लीप काढण्याची धमकी दिली होती.
तुमची व्हिडिओ क्लिप जर बाहेर काढली तर तुम्हाला फाशी घ्यावी लागेल, लोकं तुम्हाला जोड्याने मारतील. मुटकुळे यांची नजर वाईट आहे, ते घरात घेण्याच्या लायकीचे नाहीत, असे नाही नाही ते आरोप आणि टीका बांगर यांच्याकडून करण्यात आली होती. मुटकुळे-बांगर यांच्याकडून एकमेकांवर होणारी टीका, आरोप-प्रत्यारोप पाहून हेच का महायुतीतील मित्र पक्ष असा प्रश्न निश्चितच सामान्यांना पडत होता.
नगरपालिकेसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता निकालासाठी 21 डिसेंबर पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात घराच्या गल्लीत भांडणारे मुटकुळे-बांगर पुन्हा एकत्र दिसले. जणू काही घडलेच नाही, अशा पद्धतीने ते एकमेकांना भेटले, खांद्यावर हात ठेवत एकमेकांसाठी फोटोही काढले. आता हे पाहून दोघांच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला हात मारून घेतला नाही तर नवलच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.