औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला मराठवाडा विशेषतः औरंगाबाद जिल्ह्याकडून मोठे पाठबळ मिळाले. (Aurangabad) सहापैकी पाच आमदार शिंदे गटासोबत गेल्याने पक्षाला हा मोठा हादरा होता. परंतु नेते गेले असले तरी सामान्य शिवसैनिक, पदाधिकारी मात्र एकनिष्ठ राहिले. अर्थात याचे श्रेय शिवसेनेचे स्थानिक नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व अन्य पदाधिकाऱ्यांना जाते. औरंगाबाद जिल्हा गेल्या २५-३० वर्षांपासून (Shivsena) शिवसेनेचा मजबुत गड राहिला आहे. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सोडला तर शिवसेना अजूनही भक्कमपणे पाय रोवून आहे.
पक्षांतर्गत गटबाजी, कुरबुरी असून देखील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्ष एकसंध राहिल्याचे दिसले. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अपघाताने आणि मतांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या फुटीमुळे झाला होता. (Uddhav Thackeray) त्यानंतर राज्यातील अडीच वर्षांची सत्ता, शिवसेनेकडे असलेले मुख्यमंत्रीपद याचा फायदा जिल्ह्यातील विकास कामांना वेग देण्यासाठी झाला. या काळात जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे यांनी संघटना बांधणी आणि कोरोना काळात सर्वसामान्यांना केलेली मदत यामुळे लोंकाची पसंती आज देखील शिवसेनेलाच आहे.
गेली अनेक वर्ष अंबादास दानवे हे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहे. शिवसेनेत दोन जिल्हाप्रमुखांची पद्धत असली तरी नरेंद्र त्रिवेदी यांचे अस्तित्व कधीच जाणावले नाही. त्यामुळे जिल्ह्याचा एकहाती कारभार हा अंबादास दानवे हेच पाहत आले. संघटनात्मक बांधणी, जिल्ह्यात दांडगा संपर्क, पक्षाची ध्येय, धोरणं पदाधिकारी, शिवसैनिकांपर्यंत पोहचवत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात दानवेंचा हातखंडा आहे.
त्यांच्या याच कामाची दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारी देवून निवडून आणले होते. वक्तृत्व कला अवगत असल्याने ठाकरेंनी त्यांच्यावर राज्य प्रवक्ते पदाची जबाबदारी देखील सोपवली. ती देखील दानवे यांनी यशस्वीपणे पार पाडली व पाडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर झालेले सत्तांतर राज्यभरात पक्षात पडलेली उभी फूट अशा काळात औरंगाबाद जिल्हा डगमगला नाही. याचेच बक्षीस म्हणून उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या आणखी एक मोठी जबाबदारी दिली. ती म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद.
औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या इतिहासातील ही मोठी घटना म्हणून याकडे पाहिले गेले. अंबादास दानवे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर हे यश मिळवले. वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद ही मोठी जबाबदारी असल्यामुळे सहाजिकच अंबादास दानवे यांचा वावर आता राज्यभरात होत आहे. नुकसानग्रस्त भागांना भेटी, शेतकऱ्यांना दिलासा, कायदा व सुव्यवस्थेवर सरकाला धारेवर धरणे, या शिवाय पक्षाची बाजू भक्कमपणे लावून धरत विरोधकांना नामोहरम करणे या सगळ्या बाबी दानवे यांना सांभाळाव्या लागत आहेत.
एकंदरित दानवे यांच्यावरचा भार वाढला, असे चित्र आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका पाहता पक्षाने मध्यंतरी किशनचंद तनवाणी यांच्याकडे महानगरप्रमुख पदाची जबाबदारी दिली. तर दुसरीकडे नरेंद्र त्रिवेदी हे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख पक्षाला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत दाखल झाले. त्यामुळे जिल्हा पातळीवर शिवसेनेला आता नव्या जिल्हाप्रमुखाची गरज असल्याची चर्चा पक्षात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
याला दानवे विरोधकांकडून बळ मिळण्याची शक्यता असून वरिष्ठ पातळीवर या संदर्भात गांभीर्याने विचार केला जाऊ शकतो, असे बोलले जाते. अंबादास दानवे यांची जिल्हाप्रमुख पदाची कारकीर्द निश्चित उंच आणि पक्षाला उभारी देणारी राहिले आहे. परंतु एकाच व्यक्तीकडे किती पदे असावीत याचा जो नियम किंवा आचारसंहिता प्रत्येक पक्षाने आखून घेतली आहे, ती पाहता दानवे यांच्याकडील जबाबदारीचा भार हलका करण्याची हीच वेळ असल्याचे बोलले जाते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्या पदाला आणि राज्यातील जनतेला योग्य न्याय देण्यासाठी आमदार, जिल्हाप्रमुख, राज्य प्रवक्ते आणि विरोधी पक्षनेते अशा चौरंगी भुमिकेत वावरणाऱ्या दानवे यांचा भार कमी करण्याची गरज आहे, असा मतप्रवाह पक्षात वाढतो आहे. अर्थात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काय वाटते? यावरच पुढील निर्णय शक्य आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.