औरंगाबाद : काल मुंबईत येवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर धोका दिल्याचा आरोप करत त्यांना जमीन दाखवण्याचा इरादा बोलून दाखवला. तर तिकडे भाजपच्या ओंजळीने पाणी पिणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान दिले. तर शिवसेनेतून शिंदे सेनेत जाऊन मंत्री झालेल्या गुलाबराव पाटील यांनी देखील युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. या सगळ्या नेत्यांना शिवसेनेचे मराठवाड्यातील नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एकाचवेळी शिंगावर घेतले.
आला अंगावर की घेतला शिंगावर हे बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाजलेले बाळकडू आता प्रकर्षाने जाणवायला लागले आहे. (Shivsena) चंद्रकांत खैरे गेल्या चाळीस वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहेत. दोनवेळा आमदार, चारवेळा खासदार, राज्यात मंत्री राहिलेले खैरे हे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांनी देखील खैरेंचा योग्य सन्मान राखला. लोकसभा निवडणुकीत खैरेंचा थोडक्यात पराभव झाला तेव्हा हा खैरेंचा नाही तर माझा पराभव असल्याची भावना ठाकरेंनी व्यक्त केली होती.
खैरे हे एकनिष्ठ शिवसैनिक असल्यामुळे शिंदे सेना किंवा भाजपकडून ठाकरेंवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देतांना दिसत आहेत. अमित शहा यांनी मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने केलेल्या भाषणानंतर खैरेंनी आज थेट शहा काय होते, त्यांचे चांदीचे उद्योग, त्यामाध्यमातून गुजरातमध्ये होणारी चर्चा यावर भाष्य करत पंगा घेतला. एवढेच नाही तर शहा यांचे राजकीय गुरू पंतप्रधान मोदी हे आज भाजपमध्ये आहेत ते देखील बाळासाहेबांमुळेच याची आठवण देखील खैरेंनी यावेळी करून दिली.
शहा यांचा दिल्लीतून आलेला राक्षस करत खैरेंनी आपला संताप व्यक्त केला. दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांचा `सिगारेट पिणारी बाई, आम्हाला शहाणपणा आणि हनुमान चालीसा शिकवणार का? अशा भाषेत समाचार घेतला. तर गुलाबराव पाटील तू ये आता तुला गोधडी काय असते ते दाखवतो? असा दम देखील भरला. एकंदरित शिंदे सेनेसोबत गेलेले बंडखोर आमदार आणि भाजपच्या नेत्यांना जशासतसे उत्तर देण्याची भूमिका खैरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनी घेतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अधिकच वाढत जाणार एवढे मात्र निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.