Naigaon Hydropower Project : 'फडतूसपणा सहन करणार नाही, आता बस्स!' अजिंठा डोंगररांगेतील वृक्षतोडीवरून अंबादास दानवेंचा फडणवीसांना थेट इशारा

Naigaon hydropower project Chhatrapati Sambhajinagar : सोयगावमधील नायगाव जलविद्युत प्रकल्पासाठी एक लाखांहून अधिक झाडांची कत्तल होण्याची शक्यता; वनविभागाचा 'नॉट रिकमंडेड' अहवाल आणि ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही प्रकल्प पुढे नेल्याचा दानवेंचा आरोप.
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News : रायगड जिल्ह्यातील टोरंट प्रकल्पावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात प्रस्तावित असलेल्या नायगाव जलविद्युत प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

या प्रकल्पाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरोध दर्शवला असून, पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. 'हा फडतूसपणा सहन केला जाणार नाही. आता बस्स! हा प्रकल्प रद्द करा,' अशा आक्रमक शब्दांत दानवे यांनी सरकारला सुनावले आहे.

यावेळी अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पर्यावरणाच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधला. राज्याचा कारभार करताना मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये' या विचारांचा दाखला देतात. मात्र, झाडांच्या सामूहिक कत्तलीचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीच्या मुखी हे विचार शोभत नाहीत, असा घणाघात दानवे यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील सोयगाव वनपरिक्षेत्रात कल्पनेपलीकडील वृक्षतोड प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे, वनविभाग आणि ग्रामपंचायतीचे अहवाल या प्रकल्पाच्या विरोधात असतानाही वृक्षतोडीची प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. अभयारण्यातील असो किंवा अन्य वनक्षेत्रातील, झाडे ऑक्सिजन देताना भेदभाव करत नाहीत; मग ती तोडताना भेदभाव का केला जातो? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

Ambadas Danve
Amruta Fadnavis on INDIA Alliance Rally : 'इंडिया आघाडीला दुसरा मुद्दाच मिळत नाही!' अमृता फडणवीसांचा राहुल गांधींना टोला; पतीच्या टीकेला पत्नीचीही साथ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात दानवे यांनी नायगाव जलविद्युत प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या पर्यावरणावर आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी एक लाखांहून अधिक झाडांची कत्तल होण्याची शक्यता असून, मराठवाड्याची 'ग्रीन वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अजिंठा डोंगररांगेवर हा प्रकल्प विनाशकारी घाव ठरू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

Ambadas Danve
Mahendra Thorve on Sunil Tatkare : रायगडमध्ये शिंदे शिवसेनाविरुद्ध तटकरे संघर्ष पेटला! टोरंट प्रकल्पावरून महेंद्र थोरवेंचा राष्ट्रवादीला थेट इशारा

या प्रकल्पासाठी जवळपास 750 एकर वनजमीन प्रस्तावित असल्याचा मुद्दाही दानवे यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्पाच्या परिसरात सध्या वृक्षगणनेचे काम सुरू असून, मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होईल. प्रतिवृक्षारोपण करूनही ही हानी भरून काढणे शक्य नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

वनविभागाचा प्रकल्पाला विरोध असल्याचा दावा

अंबादास दानवे यांनी 2021 मधील वनविभागाच्या अहवालाचाही दाखला दिला आहे. तत्कालीन वनाधिकाऱ्यांनी अजिंठा डोंगररांगेत वन्यप्राण्यांचा मुक्त अधिवास आणि त्यांच्या संचारासाठी महत्त्वाचे मार्ग असल्याचे स्पष्ट केले होते. हा परिसर व्याघ्र भ्रमणमार्गाचाही भाग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. प्रस्तावित प्रकल्पापासून गौताळा अभयारण्य अवघ्या 7 ते 8 किलोमीटर हवाई अंतरावर आहे. त्यामुळे हा परिसर प्रकल्पमुक्त ठेवणे आवश्यक असल्याचे मत वनविभागाने व्यक्त केले होते. याच कारणास्तव उपवनसंरक्षक कार्यालयाने या प्रकल्पाला 'नॉट रिकमंडेड', असा अभिप्राय दिला होता, याकडेही दानवे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची भीती

नायगाव जलविद्युत प्रकल्पामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग नष्ट होण्याची शक्यता आहे. परिणामी, मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष वाढण्याबरोबरच संपूर्ण परिसंस्थेचा समतोल बिघडू शकतो, अशी भीती दानवे यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीचा विरोध दर्शवणारा ठराव

अजिंठा डोंगररांग ही मराठवाड्याची फुफ्फुसे असून, तेथील समृद्ध वनसंपदा नष्ट करणारा हा प्रकल्प राज्याच्या हिताचा नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पाला विरोध दर्शवणारा ठराव स्थानिक ग्रामपंचायतीनेही मंजूर केला असल्याचे दानवे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे पर्यावरण, वन्यजीव आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून राज्य सरकारने या प्रकल्पाचा फेरविचार करावा आणि तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.