Ranajagjitsinha Patil : मराठवाड्यातील मराठा चेहरा म्हणून राणा पाटील यांना विस्तारात संधी?

State Cabinet Expansion : हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. विस्तार झालाच तर मराठवाड्यातील मराठा चेहरा म्हणून तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना भाजपकडून संधी मिळू शकते.
Ranajagjitsinha Patil
Ranajagjitsinha PatilSarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या पदरी अपयश पडले आणि पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना खरेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का, याबाबत आणि विस्तारापासून होणाऱ्या फायद्याबाबत साशंकता आहे. विस्तार झालाच तर तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगतिसिंह पाटील यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मराठवाड्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. मराठवाड्यात भाजपकडे निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील हे दोनच दिग्गज मराठा चेहरे आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुधाकर श्रंगारे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने आमदार निलंगेकर यांच्यावर सोपवली होती, मात्र श्रंगारे यांचा पराभव झाला. निलंगा विधानसभा मतदारसंघातून ही श्रंगारे पिछाडीवर राहिले. त्यामुळे आमदार निलंगेकर यांनी ही जागा घालवली का, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू झाली. इकडे, उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात राणाजगतिसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांचाही पराभव झाला. आमदार पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघातूनही त्यांना मताधिक्य मिळू शकले नाही.

उस्मानाबाद मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला होता. राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार इच्छुक होते, मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. या मतदरासंघातून आमदार पाटील यांनी लढावे, असा आग्रह भाजपचा होता, मात्र जागा राष्ट्रवादीला सुटली. प्रा. बिराजदार यांना उमेदवारी नाकारून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्चनाताई पाटील यांटा पक्षात प्रवेश करून घेतला आणि उमेदवारी दिली. आमदार पाटील यांचे पठबळ मिळावे, हा त्यामागे उद्देश होता. मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत. याशिवाय शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील आमदार धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. यामुळे विजयाचे आडाखे जुळून येतील, असे फडणवीस आणि अजितदादा या दोघांनांही वाटले असावे.

या मतदारसंघात महाविकास आघाडी कागदावर अगदीच कमकुवत होती. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. भूम-परंड्याचे आमदार, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि शिंदे गटाला जागा सुटली तर उमेदवारीच्या शर्यतीत असलेले माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे ही पाठबळ महायुतीच्या पाठिशी होते. असे असतानाही अर्चनाताई यांचा पराभव झाला. महायुतीच्या सोबत असलेल्या दिग्गज नेत्यांच्या गावांतूनही अर्चनाताई पाटील यांना आघाडी मिळू शकली नाही. प्रचारा दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर बेछूट आरोप करणारे डॉ. सावंत यांच्या मतदारसंघातून अर्चनाताई पाटील सर्वाधिक 81 हजार मतांनी पिछाडीवर गेल्या.

मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठा होता. त्याचाही फटका भाजपला बसला. देवेंद्र फडणवीस याची बाजू घेत आमदार पाटील यांनी फेसबुक लाइव्ह केले होते, त्याचीही किंमत त्यांना मोजावी लागली. मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणी करण्यासाठी नुकत्याच गेलेल्या शिष्टमंडळात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाशी चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत देत उपोषण स्थगित केले. आमदार पाटील हे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. आमदार पाटील यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची संस्थात्मक ताकद वाढली आहे. पालकमंत्री सावंत हे शिंदे गटाचे आहेत. त्यांच्या कामांपेक्षा त्यांचे वागणे आणि बोलणे याचीच चर्चा अधिक असते. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Ranajagjitsinha Patil
Bjp politics : लोढांकडे बारामती, विखेंकडे नांदेड, कुलकर्णींकडे नगर; भाजप नेमकं काय शोधतंय?

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे शांत, संयमी स्वभावाचे आहेत. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला नसता तर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना निश्चितपणे महत्वाचे मंत्रिपद मिळाले असते. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती, मात्र ती खरी ठरली नाही. मंत्रिपद न मिळाल्याबद्दल आमदार पाटील यांनी कधीही नाराजी व्यक्त केली नाही.  लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह उस्मानाबाद मतदारसंघात झालेली पीछेहाट पाहता विस्तारात संधी द्यायची झाली तर आमदार पाटील यांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्या आणि भाजपकडून आमदार पाटील यांचेही नाव त्यात आले. त्यामुळे साहजिकच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com