

Beed News: बीड जिल्ह्यातील मस्साजोग हे गाव संतोष देशमुख यांच्या झालेल्या क्रूर हत्येनंतर राज्यभरात चर्चेचा विषय झाले होेते. या गावातील हत्याकांडानंतरच वाल्मीक कराडची ओळखही राज्याला झाली. वाल्मीक कराडची दहशत, त्याच्या टोळ्या, त्यांचाकडून वसूल केली जाणारी खंडणी, अपहरण, जीवे मारण्याच्या धमक्या, खून या सगळ्याच गोष्टी संतोष देशमुख यांच्या हत्येने चव्हाट्यावर आल्या. याच प्रकरणात वाल्मीक कराड व त्याचे इतर आरोपी साथीदार सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत.
दरम्यान, केज तालुक्यातील टाकळी येथील तरूण हाॅटेल चालक विलास घुले यांची टोळक्याने केलेल्या चाकू हल्ल्यात हत्या झाली. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव घेतले गेले आणि या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. मुलाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, हे सिद्ध करण्यासाठी बजरंग सोनवणे मैदानात उतरले आहेत.
दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत थेट वाल्मीक कराड-सुग्रीव कराड आणि केज पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लीपच व्हायरल केली. या क्लीपने बीड जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडवून दिली. जेलमध्ये असलेला वाल्मीक कराड कट रचतोय, असा दावा केला जात असताना बाहेर असलेल्या सुग्रीव कराडची चर्चा, त्याची पार्श्वभूमी याचाही शोध घेतला जात आहे.
सुग्रीव माणिक कराड हा केज तालुक्यातील तांबवा येथील रहिवासी असून सध्या केज परिसरात वास्तव्यास आहे. २०२२च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या एका प्रकरणात आलेल्या उल्लेखात त्याचा व्यवसाय शेती असल्याचे सांगीतले जाते. तो राजकारणात देखील सक्रीय आहे. नगरपंचायत, पंचायत समितीच्या माध्यमातून स्वतः आणि पत्नीला त्याने राजकारणात आणल्याची माहिती आहे.
परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गटासाठी तो काम करायचा अशी देखील माहिती आहे. पुढे काही काळ वाल्मीक कराड याच्यासोबतही तो होता, मात्र वादानंतर त्याने आपले स्वतंत्र अस्तित्व आणि गट तयार केल्याची माहिती आहे. केज नगरपंचायत निवडणुकीत २०२२ मध्ये सुग्रीव कराड यांच्या पत्नीने बजरंग सोनवणे यांच्या मुलीविरोधात निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीत सोनवणे यांच्या मुलीचा पराभव झाला होता. त्याची आई पंचायत समितीच्या माजी सदस्या, तर पत्नी नगरसेविका राहिल्या आहेत.
संतोष देशमुख प्रकरणातही सुग्रीवचे नाव आल्याचे सांगीतले जाते. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या कथित कबुलीजबाबांमध्ये सुग्रीव कराड याच्या नावाचा उल्लेख होता. सुदर्शन घुले याला झालेल्या मारहाणीच्या घटनेशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यातील असल्याचा दावा केलेली ऑडिओ क्लिप ऐकवली. सोनवणे यांच्या आरोपानुसार, कारागृहातून वाल्मीक कराडने सुग्रीव कराडशी संपर्क साधून सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. या संभाषणात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा झाल्याचा त्यांचा दावा आहे. सोनवणे यांनी या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून आवाज आणि संभाषणाची सत्यता पडताळावी, अशी मागणी केली आहे.
बजरंग सोनवणे यांनी व्हायरल केलेल्या आॅडिओ क्लीपनंतर सध्या बीड जिल्ह्यात सुग्रीव कराड यांची चर्चा सुरू झाली आहे. त्याची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे आता समोर आले आहे. सुग्रीव कराड याच्यावर खंडणी, अपहरण, अत्याचार, जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेतही याबाबत एका घटनेचा उल्लेख केला होता.
मस्साजोगच्या देशमुख नावाच्या एका तरुणाला उमरी टोल नाक्यावर धमकी देत त्याच्यावर जोरदार हल्ला सुग्रीव कराड याने काही दिवसापूर्वी चढवला होता. या प्रकरणात त्याच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंद झाला असल्याची माहिती बजरंग सोनवणे यांनी दिली होती.
सुग्रीव कराड टोल न भरताच निघून जात असल्याने उमरी टोल नाक्यावर त्याचा देशमुख नावाच्या तरूणाशी वाद झाला होता. त्यानंतर कराडने त्याला दिलेली धमकी, केलेली मारहाण याचा व्हिडिओ समोर आला असून तो काही दिवसांपूर्वीचाच असल्याचे बोलले जाते.
याच टोलनाक्यावरून वाल्मीक कराड टोळीने संतोष देशमुखांचे अपहरण करून हत्या केली होती. आता पुन्हा याच टोलनाक्यावर कराडच्या साथीदाराने म्हणजेच सुग्रीव कराडने मस्साजोग गावातील एका देशमुख नामक तरुणावर हल्ला केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.