

बारामतीतील विमान अपघातात अजित पवार यांचे दु:खद निधन झाले.
या घटनेनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
बीड जिल्ह्याच्या विकासाचे अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे.
Beed Politics : वेगवान, गुणवत्ता पूर्ण कामासाठी ओळखले जाणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे बीड जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात काळाने त्यांच्यावर झडप घातली. पवार कुटुंबासह संपूर्ण राज्यावर या घटनेने दु:खाचा डोंगर कोसळला. पण यातून सावरत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता ज्या बीडच्या विकासाचे स्वप्न पालक मंत्री म्हणून अजित पवारांनी पाहीले होते, तेच पूर्ण करण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
पुणे व बीड या जिल्ह्याचे पालक मंत्री पद सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहे. या संदर्भात अधिकृत अद्यादेश काढण्यात आला आहे. गेल्या वर्ष-दीड वर्षात बीड जिल्हा हा राज्याच्या नकाशावर चर्चेत आहे. पण तो चांगल्या कारणांमुळे नाही तर खून, दरोडा, महिलांवरील अत्याचार, सामाजिक तेढ, कायदा व सुव्यवस्था आणि खालच्या स्तराला गेलेले राजकारण यामुळे. ही बदनामी आणि ओळख पुसून या जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचा विडा अजित पवार यांनी उचलला होता.
सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे, गीत्ते यांच्या खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्याची प्रतिमा राज्य पातळीवर मलिन झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी बीड जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभी असताना हे चित्र वेदना देणारे होते. म्हणून अजित पवारांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वत:कडे घेतले होते. गेल्या सहा-आठ महिन्यात अजित पवारांनी बारामती, पिंपरी चिंचवड प्रमाणे काही धडाकेबाज निर्णय घेत बीडकरांना विकासाचे स्वप्न दाखवले. बीड जिल्हा आता कात टाकतोय हे स्पष्टपणे दिसत होते.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असो की मग नागरी सुविधांचा विषय अजित पवारांनी आपल्या कामाचा धडाका बीडमध्ये सुरू केला होता. पालक मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी जिल्ह्यातील तब्बल 1363 हून अधिक विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. यात रस्ते, पाणी पुरवठा योजना, शासकिय इमारती, ग्राम विकास प्रकल्प, क्रीडांगणे, सामाजिक सभागृहे आणि नागरी सुविधा यांचा समावेश होता. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांना वेळ मर्यादा देण्यात आली होती.
विकासाला आर्थिक बळ देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 575 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधितून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील प्रकल्पांना प्राधान्य देण्यात आले. जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये समतोल विकास व्हावा, यासाठी निधीचे नियोजन अजित पवारांनी केले. बीडच्या दळणवळण सुविधांनाही चालना देण्यावर अजित पवार यांनी विशेष भर दिला.
अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्याचा पाठपुरावा करण्यात आला. तसेच जिल्ह्यात विमानतळ उभारणीसाठी जागा निश्चिती आणि प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामुळे भविष्यात बीडला रेल्वे आणि हवाई मार्गाने थेट जोडण्याचे त्यांचे स्वप्न होते. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात सुमारे 1150 खाटांचे आधुनिक रुग्णालय उभारण्यास मान्यता हा त्यांच्या निर्णयामधील एक मोठा भाग होता.
वाळू माफिया, गुंडगिरीला चाप...
तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्ह्यात सुमारे 191 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीत 'सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या केंद्रातून तांत्रिक प्रशिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्ये आणि स्टार्टअप्सना चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठीही त्यांनी कठोर भूमिका घेतली.
जिल्ह्यातील गुंडगिरी, अवैध वाळू तस्करी आणि संघटित गुन्हेगारी विरोधात कडक कारवाईचे निर्देश देत आवश्यकतेनुसार 'मोक्का'सारख्या कठोर कायद्यांचा वापर करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला. विकासात अडथळा आणणाऱ्यांना थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश अजित पवार यांनी पालक मंत्री म्हणून दिला होता.
एकूणच, पालक मंत्री म्हणून अजित पवार यांनी बीड जिल्ह्यात केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कामांवर भर दिला. मोठ्या प्रमाणावर निधी, पायाभूत सुविधा प्रकल्प, आरोग्य-शिक्षणातील गुंतवणूक आणि रोजगाराभिमुख निर्णयांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळाल्याचे चित्र आहे. आता हीच गती पुढे कायम राखत अजित पवार यांनी पाहीलेल्या बीडच्या विकासाचे स्वप्न सुनेत्रा पवार या पालक मंत्री म्हणून करणार आहेत.
1. अजित पवार यांचे निधन कसे झाले?
बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात त्यांचे अकस्मात निधन झाले.
2. सुनेत्रा पवार यांनी कोणते पद स्वीकारले आहे?
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
3. अजित पवारांचे बीडसंदर्भातील स्वप्न काय होते?
बीड जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्याचे त्यांचे स्वप्न होते.
4. ही जबाबदारी आता कोण सांभाळणार आहे?
सुनेत्रा पवार यांनी बीडच्या विकासाची जबाबदारी स्वीकारली आहे.
5. या घटनेचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?
राज्यात भावनिक वातावरण असून नेतृत्वात महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.