औरंगाबाद : नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारने सर्वपक्षीय आमदारांसाठी मुंबईत तीनशे घर बांधण्याचा निर्णय घेतला. (Mahavikas Aghadi) यावरून ठाकरे सरकारवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या विरोधानंतर फुकटात घरे मिळणार नाहीत, अशी भूमिका मांडली. (Marathwada) परंतु अजूनही आमदारांना घरे देण्याचा मुद्दा राज्यात गाजतोय. शिवसेनेचे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध करत आज अनोखे भीक मांगो आंदोलन केले.
विशेष म्हणजे मुंबईत आम्हाला घर द्या, अशी मागणी विद्यमान शिवसेना आमदार उदयसिंह राजपूत यांनी सभागृहात केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी दुपारी कन्नड शहरातील पिशोर नाका येथे भीक मांगो आंदोलन सुरू केले. यावेळी त्यांच्यासोबत ईशा झा या देखील होत्या. `हमको बंम्बई मे घर बांधणे का, हम कर नही भर सकते, राम के नाम पे, अल्ला के नाम पे एक रुपया भीक दे दो`, असे म्हणज जाधव आणि झा यांनी व्यापारी, रिक्षाचालक फळ विक्रेते यांच्याकडे भीक मागितली.
जाधव यांनी या आंदोलनासाठी फाटके कपडे घातले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून जाधव यांनी सर्वच राजकीय पक्षांवर टीका केली. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे आंदोलन करण्याची पद्धत वेगळीच असते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काही काळ शांत राहिलेले जाधव आता पुन्हा सक्रीय झाले आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्या आपल्या राजकीय भूमिका मांडतात, तर कधी रस्ते, वीज, बी-बियाणांचे प्रश्न यावर रस्त्यावर उतरून प्रशासनाला धारेवर धरतात.
आता आमदारांना मुंबईत घर देण्याच्या निर्णयावर देखील त्यांनी आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच या निर्णयाच्या विरोधात भीक मांगो आंदोलनाचा इशाराही दिला होता. त्यानूसार आज दुपारी हर्षवर्धन जाधव, ईशा झा यांनी एकत्रित हातात खोक्यापासून तयार केलेले भीक्षा पात्र घेऊन पिशोर नाका परिसरात भीक मागितली.
अल्ला के नाम पे, राम के नाम पे, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काॅंग्रेस के नाम पे एक रुपया दे दो. हमको बंम्बई मे घर लेने का है. हमारे पास कर भरणे को पैसे नही, हम गरीब है, असे म्हणत जाधव आणि झा यांनी हा संपुर्ण परिसर पिंजून काढला. यावेळी त्यांच्यासोबत स्व. रायभान जाधव विकास आघाडीचे मोजके कार्यकर्ते देखील होते. परंतु आपल्या या अनोख्या आंदोलन आणि स्टाईलने जाधव व झा यांनी शहरवायियांचे लक्ष वेधून घेतले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.