जलील पठाण
Amit Deshmukh-MLA Abhimanyu Pawar News : विधानभेला हमखास निवडून येणारी जागा म्हणून औसा मतदारसंघाकडे पाहिले जाते. विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांचे स्व पक्षाच्या आमदारांपेक्षा विरोधकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता ते दुसऱ्यांदा बाजी मारतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी काँग्रेसने जिल्ह्यात मिळवलेला विजय याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होताना दिसतो आहे.
लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्याकडे आता राज्यातील काँग्रेसचे भावी नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे अमित देशमुख यांच्या राजकीय विकासाला ब्रेक लागला होता, तो अडसर आता दूर झाला आहे. याचा चांगला परिणाम लोकसभा निवडणुकीत लातूर, नांदेड, जालना या तीन मतदारसंघातील विजयाने दिसून आले.
काँग्रेसच्या निष्ठावंतांनी दाखवलेला हा विश्वास आता पडद्यामागे तडजोडी करून गमवायचा नाही, असे अमित देशमुख यांनी ठरवल्याचे दिसते. त्यामुळे `झाले गेले गंगेला मिळाले`, या प्रमाणे अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील सगळ्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. औसा विधानसभा मतदारसंघात अभिमन्यू पवार यांचे पारडे जड वाटत असले तरी अमित देशमुख यांनी जोर लावला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चित्र पालटू शकते, अशी चर्चा आहे.
त्या दृष्टीने अमित देशमुख यांनी आपल्या लाडक्या श्रीशैल्य उटगे यांना औसा मतदारसंघातून मैदानात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. (Abhimanyu Pawar) बसवराज पाटील काँग्रेसमध्ये असतांना त्यांच्यामुळे पक्षाला मिळणारी लिंगायत समाजाची निर्णायक मते आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसला पर्यायाने अमित देशमुख आणि उटगे यांना यश आले तर उटगे अप्पा विधानसभेचे मैदान मारू शकतात.
अमित देशमुख यांनी उटगे यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीत आपले वजन वापरले आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम होताच काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघात विविध योजना, प्रकल्प आणत आपली पकड मजबुत केली आहे. पण मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जो लोकसभेला महायुतीसाठी मारक ठरला, तोच पुन्हा विधानसभेला अडचणीचा ठरू शकतो.
महाविकास आघाडी याचा फायदा उचलण्यासाठी उत्सूक आहे. मराठवाड्यात काँग्रेसने लोकसभेच्या तीन जागा लढवल्या आणि जिकंल्या. शंभर टक्के रिझल्ट देणारे नेतृत्व म्हणून अमित देशमुख यांचे नाव घेतले जात आहे. अर्थात विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काँग्रेसचे उमेदवार तेच ठरवणार आहेत. लिंगायत मते काँग्रेसकडे वळवण्यात उटगे अप्पांना यश आले तर औसा मतदारसंघाचा निकाल वेगळा लागू शकतो.
औसा मतदारसंघात काँगेसच्या लिंगायत उमेदवाराची मदार मुस्लिम, दलित आणि लिंगायत मतदारांवर आहे. मात्र गेल्या निवडणुकीत लिंगायत समाजाचेच बसवराज पाटील मुरूमकर यांच्यापासून ही मते दूर गेल्याने त्यांचा पराभव झाला होता. लिंगायत समाजाची काँग्रेसपासून दूर गेलेली मते भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांच्या झोळीत गेल्या निवडणुकीत पडली. विशेषतः निलंगा तालुक्यातील 68 गावामधून पवारांना बसवराज पाटलांच्या तुलनेत मते जास्त पडली होती.
लिंगायत समाजाचे असतांना बसवराज यांच्याकडे जातीचा उमेदवार म्हणून न पाहता अभिमन्यू पवारांना पसंती दिली होती. यावेळी श्रीशैल्य उटगे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लिंगायत म्हणून समाज त्यांना स्वीकारेल का? भाजपकडे झुकलेला हा समाज पुन्हा काँग्रेसकडे वळेल का? यावर औसा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण? हे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.