कोणताही राजकीय पक्ष अथवा आघाडी हे निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्याची भाषा बोलत असतात. आघाडीतील मित्रपक्षांना जिंकवा, असे आवाहन प्रमुख नेते करत असतील तर त्याचा अर्थ असा की संबंधित आघाडी किंवा राजकीय पक्षात वरून दिसते तसे सर्वकाही आलबेल नाही. महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे वाढले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 ऑक्टोबरला मुंबईत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले. महायुतीतील मित्रपक्षांना जिंकवा, हा त्यापैकीच एक कानमंत्र.
लोकसभा निवडणुकीचा निकाल सर्वांनी पाहिला आहे. महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाला. भाजपच्या नेत्यांचे सर्व डावपेच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांच्या समोर नेस्तनाबूत झाले. महायुतीच्या एकाही नॅरेटिव्हला मतदारांनी थारा दिला नाही.
सर्वार्थाने शक्तिशाली असलेल्या भाजपवर ही वेळ का आली असेल? विशेष म्हणजे राज्यातील दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फुटून प्रमुख नेते आणि 80 आमदार भाजपच्या सोबत आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात महायुतीला मिळालेले अपयश हे भाजपची धडधड वाढवणारे ठरले आहे. त्यामुळे भाजपसह महायुतीचाही आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे चित्र दिसत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याचा रोष भाजपवर आला. त्याचे खापर भाजपच्या माथी फुटले. एकनाथ शिंदे यांचा गट आणि भाजपचे सरकार व्यवस्थित चालत होते. शिवसेना फुटल्यानंतर वर्षभरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर हात घातला आणि येथेच भाजपच्या अपयशाची पायाभरणी झाली.
सर्व विरोधक भ्रष्टाचारी आहेत, असा प्रचार भाजपकडून सातत्याने केला जातो. त्याचा मतदारांना आता वीट आला आहे, कारण भ्रष्टाचाराचा आरोप करायचा, चौकशांचा ससेमिरा लावायचा आणि तोच नेता भाजपमध्ये आला की त्याचा मानसन्मान करायचा, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. यामुळे भाजपच्या विरोधकच भ्रष्टाचारी या नॅरेटिव्हला लोकांनी लोकसभा निवडणुकीत धुडकावून लावले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत महायुतीत आलेल्या अनेक नेत्यांना चौकशीच्या ससेमिऱ्यापासून दिलासा मिळाला आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लागणार होता, त्यामुळेच ते शिवसेनेतून फुटून भाजपसोबत गेले, असा दावा ठाकरे गटाकडून अनकेवेळा करण्यात आला आहे. अजितदादा पवार राष्ट्रवादीतून फुटून भाजपसोबत गेले, त्याच्या काही दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. अजितदादांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत.
गेल्या काही वर्षांपासून भाजपने नियोजनबद्ध मोहीम राबवून विरोधी पक्षांची प्रतिमा मलिन केली आहे. भाजप नाही तर मग कोण, असा विचार बहुतांश मतदारांना करायला लावण्यात ती मोहीम यशस्वी झाली. त्यातूनच आपण काहीही केले तरी चालते, आपण कसेही वागलो तर लोक आपल्यालाच निवडून देतील, असा आत्मविश्वास भाजपमध्ये निर्माण झाला होता.
लोकसभेच्या यापूर्वीच्या दोन निवडणुका आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकीत भाजपचा हा आत्मविश्वास खरा ठरला. मात्र, आता हळूहळू लोकांच्या लक्षात हे यायला लागले आहे. महाराष्ट्रातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचा हा आत्मविश्वास खोटा ठरवला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यांवर पातळी सोडून केलेली टीका आम्ही मान्य करणार नाही, हे मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना दाखवून दिले. या संकटांचा सामना करणाऱ्या महायुतीच्या समोर अंतर्गत कलहही आ वासून उभा राहिलेला आहे.
महायुतीच्या या संकटात अजितदादांच्या प्रवेशामुळे आणखी भर पडली. अजितदादा महायुतीत आल्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याची मंत्रिपदे कमी झाली. त्यामुळे अंतर्गत कलह आणि वर्चस्वाची लढाई सुरू झाली. गंमत म्हणजे, सर्वाधिक 105 आमदार असलेल्या भाजपला या दोन्ही पक्षांसमोर नमते घ्यावे लागत आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला.
सरकार असूनही आपली झोळी रिकामीच राहिली, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपलाही वरचढ ठरत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये असंतोष आणखी वाढला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीचत महायुतीतील पक्षांची मते एकमेकांकडे ट्रान्स्फर झाली नव्हती. विधानसभेला तसे होऊ नये, याची काळजी अमित शाह घेत आहेत. त्यामुळेच ते मित्रपक्षांना जिंकवा, असे म्हणत आहेत. राजकारणातील वर्चस्वाची लढाई एकमेकांचे उमेदवार पाडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तीही भीती अमित शाह यांना असावी. अजितदादा पवारांचा प्रवेश झाल्यानंतर महायुतीत अंतर्विरोध, अंतर्गत कलह वाढले आहेत. हे सारे ओझे घेऊन महायुती निवडणुकीला कशी सामोरी जाणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महायुतीसमोर यावेळी महाविकास आघाडीचे तगडे आव्हान आहे. शरद पवार यांच्या डावपेचांसह उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि राज्यभर विखुरलेल्या काँग्रेसच्या तरुण नेत्यांच्या फळीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला गारद केले.
महायुतीतील अंतर्गत कलह भाजप नेत्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळे महायुती एकदिलाने महाविकास आघाडीचा सामना करणार का, याबाबत शाह यांच्या मनात साशंकता असल्याचे दिसून येत आहे. मित्रपक्षांना जिंकवा म्हणजेच अंतर्गत कलह बाजूला ठेवा, असा स्पष्ट संदेश अमित शाह यांनी दिला आहे. तो कितपत पाळला जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.