Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी तातडीने संभाजीनगरात येऊन आढावा बैठक घेतली. चारा, पाणी, टॅंकर याची कुठेही कमतरता भासू देऊ नका, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. मराठवाड्यातील पाणी पातळी वाढवण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओंची मदत घेणार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे मराठवाडा व राज्यातील ज्या ज्या भागात पाणी, चारा टंचाई किंवा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येत नाहीये. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील करण्याची मागणी केली होती. यावर अद्याप निर्णय झालेला नसला तरी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळी परिस्थितीचा विचार करता गुरुवारी तातडीने आढावा बैठक घेतली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संभाजीनगरात(Chhatrapati Sambhajinagar) दुपारी तीन वाजता झालेल्या या बैठकीची माहिती माध्यमांना देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले असल्याचे सांगितले. मराठवाड्यात 1837 टँकरच्या माध्यमातून 1250 गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. ही संख्या अजून वाढवण्याची गरज भासल्यास ग्रामसेवक, तलाठी पातळीपर्यंत सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार मागणी होईल तशी टॅंकरची संख्या वाढवून पाणीपुरवठा केला जाणार आहे. पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली जाईल. पुरवले जाणारे पाणी स्वच्छ असले पाहिजे, पाण्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे अशा सूचना देतानाच डीपीडीसी मधून चारा उगवण्यासाठी पैसे दिले होते याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. जिल्ह्यामध्ये सध्या पुरेल एवढा चारा आहे. चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी सूचना दिलेल्या आहेत.
पाणीपुरवठा केला जाणाऱ्या संस्थाचा वीज पुरवठा थकीत बीलासाठी खंडीत केला जाणार नाही. जुन्या बीलाचे नंतर पाहू, सद्यस्थितीत थकीत बिलामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना यावेळी दिल्या.
मराठवाड्यातील जमीनीतील पाणीपातळीत वाढ करण्यासाठी या विषयावर काम करणाऱ्या एनजीओसोबत सरकारने काम सुरू केले आहे. यात प्रामुख्याने अमीर खान यांची नाम फाऊंडेशन, आप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण यांच्यासह अनेक संस्थाची मदत घेतली जाणार आहे. गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
पाण्याची साठवण क्षमता वाढली तर पाणीसाठा वाढेल. पाण्याचे नियोजन व्यवस्थित व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, तशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले. तसेच बोगस बियाणे आणि खत आढळले तर ते विक्री करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाणार आहे.
प्रमुख पुरवठादाराची माहिती घेऊन तपासणी केली जाईल. बोगस बियाणांच्या विक्रीवर पुर्णपणे सरकारची यंत्रणा नजर ठेवून राहील त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येणार नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.