Chhatrapati Sambhajinagar : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील तीन ते चार वर्षात उभी करण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करण्यात येणार असल्याचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ट्रु बीम' ही सुविधा मराठवाड्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे ट्रू बीम सारखी कर्करोगावरील उपचारासाठी अद्यावत सुविधा उपलब्ध होत आहे, याचे समाधान आहे. राज्यात शासकीय आरोग्य व्यवस्थेत छत्रपती संभाजीनगर येथे पहिल्यांदा ही अद्ययावत उपचार यंत्रणा उपलब्ध होत आहे. जीवन पद्धतीत झालेल्या बदलांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोगावरील उपचारासाठी रेडिएशन, कीमोथेरेपी यासारखी पद्धती वापरली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसित होत आहे.
ट्रु बीम सारख्या अद्यावत यंत्रामुळे ज्या भागात संक्रमण आहे, त्याच भागात नेमकेपणाने रेडिएशनद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे. या उपचारासाठी राज्यात टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे जावे लागत होते, देशभरातून तिथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने टाटा मेमोरियल हॉस्पिटलवर मोठा भार आहे. मात्र आता छत्रपती संभाजीनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली असून मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील कर्करोगाच्या रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर येथे अद्ययावत कर्करोग सुविधा उपलब्ध होण्यासाठी केंद्र शासनाकडून सहाय्य मिळावे, यासाठी 2016 मध्ये येथील कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्यक कार्यवाही करून आज अद्ययावत उपचार सुविधा उपलब्ध झाली असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, कर्करोगावरील संपूर्ण उपचार रुग्णांना मिळावेत, यासाठी पेट सिटी स्कॅनरलाही मंजुरी देण्यात आली आहे.
हे उपकरण कार्यान्वित झाल्यानंतर कर्करोग रुग्णांवरील उपचारासाठी आणखी चांगली सुविधा मिळू शकेल. कर्करोग बरा होण्यासाठी लवकर निदान महत्वाचे असते, मात्र अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे राज्य शासनाच्या सर्व वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थांमध्ये याबाबतची तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. यासोबतच कर्करोग होवूच नये, यासाठीही जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे फडणवीस म्हणाले.
राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये जवळपास दहा नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढल्या आहेत. वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभूत सुविधांसाठी जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुपांतरीत झाले आहेत, अशा जिल्ह्यात स्वतंत्र सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णयही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.