Uddhav Thackeray On Reservation : उद्धव ठाकरेंची सावध भूमिका; आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा-ओबीसींना साद...

Uddhav Thackeray visit to Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात सावध भूमिका मांडली. मराठा-ओबीसी-धनगरांसह अठरापगड जातीच्या लोकांनी आपापसात न भांडता एकत्रित येऊन आरक्षणाचा लढा लढावा, असे ठाकरे यांनी म्हटले.
Uddhav Thackeray On Reservation
Uddhav Thackeray On ReservationSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : लोकसभा निवडणुकीत हक्काची छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा गमवावी लागली याचे शल्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या संभाजीनगरमध्ये पराभव झाला तिथेच उद्धव ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळावा घेतला आणि राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन घडवण्याचा निर्धार केला.

आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात असलेल्या तणावाच्या वातावरणावर सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

मराठा-ओबीसी-धनगरांसह अठरापगड जातीच्या लोकांनी आपापसात न भांडता एकत्रित येऊन आरक्षणाचा लढा लढावा, शिवसेना (Shiv Sena) तुमच्या पाठीशी राहील, अशी साद उद्धव ठाकरे यांनी यावेळी घातली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले. यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार विरोधात समाजामध्ये असलेला रोष महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट झाले.

Uddhav Thackeray On Reservation
Shivsena UBT News : जिथे लोकसभेचा पराभव, त्याच संभाजीनगरातून ठाकरे विधानसभेचे रणशिंग फुंकणार..

ज्या काँग्रेसचा राज्यात एकही खासदार नव्हता, त्या पक्षाचे 13 खासदार, शिवसेना ठाकरे गटाचे 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे 8 खासदार निवडून आले आहेत. महाविकास आघाडीत सर्वाधिक फायदा काँग्रेसला झाल्याचे यावरून स्पष्ट झाले. महाविकास आघाडीच्या या विजयात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वळलेली एकगठ्ठा मते हे प्रमुख कारण होते. शिवसेना ठाकरे गटाला परभणी, धाराशिव, हिंगोलीमध्ये याचा मोठा फायदा झाला. अर्थात या ठिकाणी उमेदवारही मराठाच होते.

Uddhav Thackeray On Reservation
Raju Shinde: राजू शिंदेंच्या ठाकरे गटातील प्रवेशामुळे शिंदें गटाचे आमदार शिरसाट यांची डोकेदुखी वाढणार

पण गैर मराठा उमेदवार असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारंसघात मात्र ठाकरे गटाला अपयश आले. चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर गेल्याने मराठा समाजाची मते खैरेंना मिळाली नाही हे स्पष्ट झाले. राज्यातील शिवसेना ठाकरे गटाला अनेक मतदारसंघात याचा फटका बसला. यातून धडा घेत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखताना उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याचे त्यांच्या आजच्या शिवसंकल्प मेळाव्यातील भाषणातून दिसून आले.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पुढे जाऊन मोठा भाऊ व्हायचे असेल तर मराठा-ओबीसी-धनगरांसह सर्व छोट्या-मोठ्या पक्षाची मते मिळणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवत अंतरवाली सराटीत जाऊन त्यांची भेट घेतली होती. पण यामुळे ओबीसी मतदार शिवसेनेपासून काहीसा दुरावल्याचे लोकसभा निवडणुकीतील निकालावरून दिसून आले होते.

लोकसभेला झालेली चूक विधानसभेला टाळण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजच्या भूमिकेतून केला. महायुती सरकारला व्हिलन ठरवत ठाकरेंनी मराठा-ओबीसी समाजाला साद घालत त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणावरून कोणत्या एका समाजाची बाजू घेणे राजकीयदृष्ट्या कोणत्याच पक्षाला परवडणारे नाही.

त्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाच्या टक्केवारीची मर्यादा वाढवण्याचा पर्यायच योग्य असल्यावर उद्धव ठाकरे यांचेही एकमत झाल्याचे त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर दिसून आले. विधानसभेत तसा ठराव घेतल्यास त्याला आपला पाठिंबा असेल असेही ठाकरे यांनी जाहीर करून टाकले. केंद्रात माझे खासदार महाराष्ट्र सरकारच्या ठरावाला पाठिंबा देतील, अशी व्यापक भूमिका घेत उद्धव ठाकरे यांनी सावध पावले उचलली आहेत. त्यांच्या या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील, ओबीसी नेते काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com