Hingoli News : राजकारणात जरा काही मिळेल की नेते लगेचच दोन-चार पावले पुढे येतात. त्याआधी दहा पावले पुढे जाऊन नेत्यांचे चेले काय बोलतील आणि काय करतील, याचा नेम नसतो. अगदी तसे आता ठाकरेंच्या एका ‘एक्झिट पोल’ खासदाराने पावलांवरचे नाही कोसो दूर पोचून उगाचच पुडी सोडली आणि ठाकरेंना थेट पंतप्रधानपदावर पाहाणे आवडेल, असे बोलून दाखवले.
आता जेमतेम डझनभर खासदार घेऊन मोदी- शहांना (Amit Shah) टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या ठाकरेंना दिल्लीत पाहायला आवडेल, अशी भलीमोठी अपेक्षा मांडून या एक्झिट पोल खासदाराने कमालच केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Nagesh Ashtikar News)
हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील-आष्टीकर (Nagesh Patil) यांचे नाव ओपिनियन पोलमध्ये आघाडीवर दाखवले जात आहे. त्यामुळे त्यांनी मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा दावा केला आहे. त्यासोबतच पंतप्रधानपदाबद्दल आष्टीकर यांनी निवडणूक निकाल येण्याआधीच मोठं वक्तव्य केले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल काही तासांवर येऊन ठेपला असताना, आष्टीकर यांनी पंतप्रधानपदाबद्दल महत्त्वाचे विधान केले. हिंगोली लोकसभेत आपल्याला यश मिळणार असल्याचा दावा करताना त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाहायला आवडेल, असे ते म्हणाले.
हिंगोली लोकसभेची मतमोजणी 4 जूनला होणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता निवडणूक निकाल येण्यापूर्वीच आष्टीकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर देशाचे पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान झाल्यास आपल्याला आनंद होईल, असे म्हणत सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
लोकसभा निवडणूक निकाला आधीच महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट मशीनवरील मतदान झालेल्या पावत्यांची मोजणी प्रत्येक फेरीच्या मतमोजणी सोबत करावी, अशी मागणी केली आहे. मतदान मोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर ही मोजणी करण्यात येत असल्याने गोंधळ निर्माण होत असल्याचे आष्टीकर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.