युवराज धोतरे
Local Body Election : उदगीर नगरपालिकेच्या निकालकाडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. इथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने युती केली होती. तर काँग्रेसही आघाडीत लढली. संजय बनसोडे, संभाजी पाटील निलंगेकर आणि अमित देशमुख या तीन माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. एकूण 84 हजार मतदारांमध्ये 28 हजार अल्पसंख्याक मतदारांभोवतीच उदगीर नगरपालिकेचा निकाल फिरणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. काँग्रेस आघाडीने डॉ. अंजुम कादरी यांना उमेदवारी देत भाजप-राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले आहे. असे असले तरी पारंपारिक वोट बँक युतीला साथ देईल, असा दावाही केला जातोय.
नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होऊन आठ दिवस उलटल्यावरही अंदाज, आकडेमोड करीत विजयाचे गणित मांडण्यात नेते-कार्यकर्ते व्यस्त आहेत. नगराध्यक्षपदासाठी अत्यंत चुरशीची दुरंगी लढत झाल्याने विजयी कोण होणार? याची उत्सुकता आहे. सर्वाधिक मुस्लिम मतदार असल्याने तेच निकाल ठरविणार हा अंदाज प्रत्येकाकडून व्यक्त होत असल्याने गुंता अधिकच वाढला आहे. वेगळ्यावेगळ्या पद्धतीने समीकरणे मांडत दोन्ही गटांकडून विजयाचे दावे होत आहेत.
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे विरुद्ध आमदार अमित देशमुख यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस युतीमधून नगराध्यक्षपदासाठी भाजपने स्वाती सचिन हुडे यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेस आघाडीकडून डॉ. अंजुम कादरी यांना उमेदवारी दिली होती. महायुतीकडून दोन आमदार व काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख, माजी आमदार धीरज देशमुख यांनी आव्हान उभे केले होते.
याशिवाय निवडणुकीत लक्ष्मी दर्शनाचा मुद्दाही दोन्ही बाजूंनी गाजला. तरी दोन्ही बाजूने मतदार आपलेच आणि आपण मतदारापर्यंत पोचल्याचे दावे होत असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे. उदगीर शहरात सुमारे 84 हजार मतदार असून यातील 28 हजार मुस्लिम मतदार आहेत. याशिवाय लिंगायत, बौध्द, मातंग, ओबीसी, जैन, मारवाडी आदी समाजाची एकगठ्ठा मते आहेत. त्यांची मते कुणाकडे झुकली हे ही समीकरण महत्वपूर्ण आहे. शहराच्या हिंदूबहुल भागात भाजपला निर्णायक मते मिळतील असा अंदाज व्यक्त होत आहे.
मुस्लिम बहुल भागात काँग्रेसला निर्णायक मते मिळतील, मात्र त्यात एमआयएमला व भाजपला किती मते मिळतील यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. मतदान होऊन आठवडा उलटला असला तरी मतमोजणीला अजूनही दीड आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांचे समर्थक सध्या आकडेमोड करण्यातच व्यस्त आहे. नगराध्यक्षपदाच्या निकालाचा अंदाज लावणे कठीण बनले आहे, तसेच नगरसेवकांच्या काही जागांचे निकालही धक्कादायक लागण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
नगरसेवकांच्या पाच ते सात जागांवर एकतर्फी विजय होईल, असेही सांगितले जाते. त्याचवेळी सुमारे 18 ते 20 जागांवर काँटे की टक्कर झाली आहे. काही ठिकाणी मतविभागणीमुळेही निकाल बदलताना दिसू शकेल. असे असले तरी राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपला नेमक्या किती जागा मिळतील? याची उत्सुकता आहे.
नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष व 37 जागांसाठी मतदान झाले. मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार असून, ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉग रूमसमोर काही काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी जागता पहारा देत आहेत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.