

Beed News : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांनी पोटदुखीची तक्रार केल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. विविध तपासण्या, औषधोपचारानंतर वाल्मीकची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. काही तासांसाठी तुरूंगातून बाहेर आलेल्या वाल्मीकची अवस्था पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
दरम्यान, वाल्मीक कराडच्या मुत्राशयावर सूज आल्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास आणि ताप आल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. सात दिवसांच्या औषधोपचारानंतर पुन्हा तपासणीचा सल्ला वाल्मीकला देण्यात आला आहे. ताप व पोटदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर वााल्मिक कराडला कारागृह प्रशासनाने शुक्रवारी तपासण्या व उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दीही झाली होती.
विविध वैद्यकीय तपासण्या करुन औषधोपचारानंतर पुन्हा त्याला कारागृहात नेण्यात आले. 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सुत्रधार असल्याचे विशेष तपास पथकाच्या तपासातून समोर आले. यासह आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि कंपनीच्या मस्साजोगच्या प्रकल्पावरील मागासवर्गीय सुरक्षारक्षकाला शिवीगाळ व मारहाण प्रकरणीही त्याच्यावर ठपका आहे.
दरम्यान, घटनेनंतर 22 दिवस फरारी असलेला वाल्मिक 31 डिसेंबर 2024 रोजी पोलिसांना शरण आला. गेल्या साडे पंधरा महिन्यांपासून तो सुरुवातीला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडीत येथील जिल्हा कारागृहात आहे. उच्च न्यायालयाचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ व सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामिन अर्ज फेटाळला आहे.
मुत्राशयाच्या पिशवीला सूज
दरम्यान, वाल्मिकला ताप व पोटदुखीचा त्रास असल्याने कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्याला औषधोपचार केला जात होता. मात्र, हा त्रास कमी होत नसल्याने आज त्याला तपासणी व उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. चौधरे व शल्यविशारद डॉ. वाघमारे यांनी त्याची तपासणी करुन सोनोग्राफी, सीटीस्कॅन तसेच रक्त व लघवीच्या तपासण्या करण्याचा सल्ला दिला.
तपासण्यांच्या अहवालातून त्याच्या मुत्राशयाच्या पिशवीला थोडीशी सुज असल्याने ताप व पोटदुखीचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याला सात दिवसांची औषधे देत पुन्हा सात दिवसांनी वैद्यकीय तपासणीचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर त्याला कारागृहात नेण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.