Beed News : बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख प्रकरणात अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. या प्रकरणातून आपल्याला दोषमुक्त करावे, असा अर्ज कराड याने वकिला मार्फत केला होता. गेल्या सुनावणीच्या वेळी हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर आजच्या सुनावणीत न्यायालयाने आपले निरीक्षण नोंदवताना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचे नमूद केले. आता दोष मुक्तीसाठी वाल्मिकच्या वकीलांकडून हायकोर्टात धाव घेण्यात येणार आहे.
संतोष देशमुख यांची खंडणीच्या वादातून अपहरण आणि त्यानंतर निर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी करत त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे. बीडच्या विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच वाल्मिक कराड (Walmik Karad) हा जेलमधून आपले नेटवर्क बीड आणि राज्याचा इतर शहरांमध्ये चालवत असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आजच्या सुनावणीत काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, आजच्या सुनावणीत विशेष मकोका न्यायालयाने सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचे निरीक्षण नोंदवले. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याने आपल्या या खटल्यातून दोष मुक्त करावे असा अर्ज बीडच्या विशेष न्यायालयात (Beed News) सादर केला होता. तो फेटाळून लावताना न्यायालयाने महत्वाची निरीक्षण नोंदवली. वाल्मिक कराड हाच टोळीचा म्होरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करत कट रचून त्यांची हत्या केल्याचं समोर आले आहे.
वाल्मिक कराडवर वीसपेक्षा अधिक गुन्हे दाखल असून यात मागील 10 वर्षातील सात गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्याचा समावेश आहे. आवादा कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमक्या देणे, साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्या आधारे वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. दोष मुक्तीचा अर्ज फेटाळण्यात आल्याने आणि कराड हाच मुख्य सुत्रधार असल्याचे न्यायालयाने सांगितल्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
विशेष न्यायालयाने दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर आता वाल्मिक कराड याचे वकील हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. 22 जुलै रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करून विरोध केला होता. कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.