प्रा. प्रवीण फुटके
Beed NCP Political News : मी आज अजित पवारांसोबत आहे, पण शरद पवार यांचा आजही आदर करतो. त्यांच्यावर व्यक्तिगत टीका कधी करत नाही. पण त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने माझे कुटुंब, माझ्या जातीवर टीका करावी लागते हे योग्य नाही, अशी खंत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. मला आजपर्यंत अनेकांनी मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले, असा आरोपही मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या केला.
परळी येथील एका कार्यक्रमात धनंजय मंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी ठिकठिकाणी प्रचाराचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेल्या नेत्यांना शरद पवार गटाकडून लक्ष्य केले जात आहे. राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघावर स्वतः शरद पवारांनी विशेष लक्ष घातले आहे.
धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत शरद पवारांनी नुकतीच त्यांच्यावर टीका केली होती. परळीतील अनेक मुंडे समर्थक तरुण कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी हाती घेत आहेत. बीड जिल्ह्यात शरद पवार यांच्याकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घेरण्याचे प्रयत्न केले जात असताना मुंडे यांनी पलटवार केला आहे. सुरवातील शरद पवारांच्या टीककडे दुर्लक्ष करणाऱ्या धनंजय मुंडे यांनी आता मात्र पावित्रा बदलला आहे.
विधानसभेची निवडणुक तोंडावर असताना जशासतसे उत्तर देण्याची भूमिका घेतली नाही, तर त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. `मुझे गिराने के लिए कई बड़े लोग बार बार गिरे, मगर ये मुमकिन नही है, अशा शायराना अंदाजात धनंजय मुंडे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना नाव न घेता टोला लगावला.
मला इथेच बांधून ठेवणे, मला लक्ष्य करणे हे आजचे नाही. अनेक जणांनी हा प्रयत्न केला आहे. वाईट एका गोष्टीचे वाटते, ज्या नेत्यांचा आम्ही आजही आदर करतो. त्या नेत्यांना ही पातळी गाठली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी पक्षात फूट पडली त्यात अजित पवारांना धनंजय मुंडे यांची भक्कम साथ होती. मुंडे सुरवातीपासूनच अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जातात.
लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देत शरद पवारांनी धनंजय- पंकजा मुंडे या बहीण भावासह महायुतीला झटका दिला होता. आता विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये घड्याळाची टीकटीक बंद पाडण्यासाठी शरद पवार नव्या जोमाने तुतारी फुंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. धनंजय मुंडे व त्यांची राष्ट्रवादी याचा कसा सामना करणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.