Loksabah Election 2024 : जालना जिल्ह्यातील दोन मोठे नेते रविवारी एकाच व्यासपाठीवर एकत्र आले. दोघांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटणाऱ्या विरोधकांना मात्र धक्का बसला. हे दोन नेते म्हणजे लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे सहाव्यांदा उमेदवार असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जून खोतकर. मतदारसंघातील गोलापांगरी येथील प्रचार सभेत दानवे-खोतकर एकत्र आले होते.
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे(Raosaheb Danve) यांना कॅबिनेट मंत्री झालेलं पाहिचयं, अशी इच्छा अर्जुन खोतकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. राजकराणात सत्य, चांगुलपणा महत्त्वाचा असतो आणि तो रावसाहेब दानवे आणि माझ्यात आहे, आम्ही तो कायम जपत आलो आहे, असेही खोतकर म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या काही दिवसांत राजकीय वर्तुळात खोतकर (Arjun Khotkar) आणि दानवे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पण या चर्चा फोल असल्याचे दानवे आणि खोतकर यांनी एकत्रित प्रचार करत दाखवून दिले. आमच्यात मतभेद होतात, काही गोष्टी पटत नाहीत हे सांगतानाच म्हणजे आम्ही फारकत घेतली असे होत नाही. कुठे थांबायचं हे आम्हाला कळतं. संबंध जपणे आणि सांभाळणे हीच भूमिका आपण घेत आलो आहोत, असे खोतकर यांनी स्पष्ट केले.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करणे आणि रावसाहेब दानवे यांना केंद्रात कॅबिनेट मंत्री करणे हेच आमचे ध्येय असल्याचे, खोतकर म्हणाले. याच सभेत त्यांनी उपस्थितांना अमित शाह(Amit Shah) यांच्या जाहीर सभेला येण्याचे निमंत्रणही देऊन टाकले. न करो किसी से नफरत, नफरत आग लगा देती है अशा शायराना अंदाजात खोतकर भाऊ व दादा यांच्यातील दुरावा संपल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी जाहीर केले.
अर्जून खोतकरांकडून कौतुक आणि कॅबिनेट मंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात आपल्या शैलीला साजेशी अशी टोलेबाजी केली. राजकारणात चांगले कामे केल्यामुळे मी सभापती, आमदार, खासदार, मंत्री झालो. आपण केंद्राकडून मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी आणला.
तथापि बांधकाम, सिंचन ही खाती राज्य सरकारकडे असल्याने आपण उद्घाटनाला येत नाही. अर्जुनराव खोतकर व अरविंदराव चव्हाण या माझ्या सुना आहेत तर मी त्यांची सासू. त्यामुळे सासूचे काम केवळ निधी आणणे आहे. त्यामुळे मी आणलेल्या निधीतून झालेल्या विकास कामांचे उद्घाटन मीच करत आहे, असा चिमटा रावसाहेब दानवे यांनी काढला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.