Aurangabad : चांगली इकोसिस्टीम तयार झाल्याने ऑरिक आणि औरंगाबाद-जालना ही दोन्ही शहरं भविष्यातील इंडस्ट्री ठरतील. पुढील सहा महिन्यांत समृद्धी महामार्ग मुंबईला जोडला गेला की झपाट्याने विकास होईल. तेव्हा औरंगाबाद-जालन्याला कुणी ही थांबवू शकणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (Marathwada) मराठवाडा-विदर्भातील उद्योगांसाठी असलेल्या विजेच्या सवलतीचा फेरआढावा घेऊन नवीन पॉलिसी आणू असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेंद्रा, ऑरिक सिटी येथे मसिआतर्फे आयोजित ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. (Devendra Fadanvis) फडणवीस म्हणाले , मसिआने आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरविले आहे. त्यासाठी केलेली तुमची मेहनत महत्त्वाची आहे. आपल्यामध्ये एक जिद्द आहे, या भागात चांगली इकोसिस्टीम तयार झाली आहे. त्यामुळे सातत्याने सांगत आलोय भविष्यातील उद्योग हे ऑरिक (Aurangabad)औरंगाबाद-जालना येथेच येणार आहेत. उद्योग वाढवायचे असेल तर कनेक्टीव्हीटी महत्त्वाची आहे.
पुढील सहा महिन्यात समृद्धीची मुंबईपर्यंत कनेक्टीव्ही मिळेल तेव्हा औरंगाबाद, जालन्याला कुणी थांबवू शकणार नाही. तुम्ही जोपर्यंत ग्लोबल पुरवठा साखळीचा भाग होत नाही. तोपर्यंत ग्लोबली काम करता येत नाही. आज सुदैवाने हा काळ, संधी आलेली आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आता आपण तिसऱ्या क्रमांकाकडे आगेकूच करत आहोत. मंदीच्या काळात विकास दर ७ ते ८ टक्क्यांपर्यंत राहिला. पंतप्रधान मोदी यांनी कोविड काळात २० लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज दिले. लघु मध्यम उद्योगांसाठी विविध योजना आणल्या.
आता जगाचा चीनवरील विश्वास संपला आहे. जगाचे एकूण ४० टक्के उत्पादन एकटा चीन करत होता. प्रमुख महत्त्वाचे ३० टक्के उत्पादन चीन मध्ये होत होते. आज जगाच्या लक्षात आले, आपण एकाच बास्केटमध्ये राहू शकत नाही. चीनमधील नियम पारदर्शक नाही. तेथे मालमत्ता सुरक्षित नाही, त्यामुळे चीनमधून जागतिक गुंतवणूकदार हळूहळू बाहेर पडत आहेत. ज्या प्रमाणात चीनमधून उद्योग बाहेर पडत आहे ते उद्योग पचविण्यासाची क्षमता फक्त भारताकडे आहे. त्यामुळे पुढील दहा-वीस वर्षात मिळणार नाही, अशी संधी मिळाली आहे.
सरकार आणि उद्योगांनी काम करणे महत्त्वाचे आहे. हा एक्स्पो महाराष्ट्र, देश आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचा आहे. येथे इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईलची क्षमता तयार झाली आहे, हे योग्य प्रकारे केले तर यातून गुंतवणूक येईल. चांगल्या सुविधा असल्या तर नवीन उद्योग येतात. चांगल्या क्षमतेची औद्योगिक निर्मिती होत आहे. आमचे सरकार आल्यावर असा एक दिवस नाही ज्या दिवशी आम्ही गुंतवणूकदारांशी चर्चा करत नाही. येथे येण्यापूर्वी मी तासभर एका मोठ्या ताईवान कंपनीशी चर्चा केली. आम्ही उद्योगांसाठी अनुकूल वातावरण तयार केले आहे.
पूर्वीच्या सरकारमध्ये पंधरा महिने कॅबिनेट सब कमिटीची मिटींग झाली नाही. आम्ही सहा महिन्यात दोन बैठका घेऊन ९० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीस परवानगी दिली. ऑरिक मधील सगळ्या मागण्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ऑरिक मध्ये लघु-मध्यम उद्योगांसाठी शंभर एकरवर प्लॉट राखीव ठेवले असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगांना वीज सबसिडी दिली जात होती. आता आम्ही या सबसिडीसाठी नवीन पॉलिसी आणणार आहोत. यात कमी गळती असलेल्या ठिकाणी जास्त लाभ देता येईल.
तसेच कृषी क्षेत्र आम्ही सोलारवर रुपांतरीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे उद्योगांवरील ताण कमी होऊन स्वस्तात वीज मिळेल. शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज ७ रुपयांनी खरेदी केली जाते, त्यांना दीड ते दोन रुपयांना देतो. तसेच नागपूर-गोवा हायवे तयार केले जात असून त्याचा मराठवाड्यातील चार ते पाच जिल्हे एकमेकांशी जोण्याला मदत होणार आहे. ऑरिक मध्ये ५० एकर जागेवर होणाऱ्या कन्व्हेक्शन सेंटरच्या बांधकामासाठी केंद्र व राज्य सरकारची हवी ती मदत द्यायला तयार आहोत, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.