भाजपचे जेष्ठ नेते तथा फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ बागडे नाना राजस्थानचे राज्यपाल झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परतले आहेत. 17 ऑगस्ट हा बागडे यांचा वाढदिवस, त्यामुळे तो आपल्या मतदारसंघात आणि मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्टांसोबत साजरा करण्यासाठी राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शनिवारी संभाजीनगरात आले.
राज्यपाल झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असल्याने त्यांच्या स्वागतासाठी भाजपची नेतेमंडळी, पदाधिकारी कार्यकर्ते आणि विशेषता फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्यांची गर्दी मोठी होती. या इच्छुकांसाठी बागडे नानांचा ( Haribhau Bagade ) हा दौरा फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण, या दौऱ्यातच फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची सुभेदारी महामहिम बागडे नाना कोणावर सोपवतात? याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
हरिभाऊ बागडे हे राज्यपाल म्हणून राजस्थानमध्ये गेले असले तरी फुलंब्री विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणाला द्यायची? याचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी त्यांना विचारल्याशिवाय घेणार नाही हे निश्चित. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्ताने मतदारसंघात आलेल्या नानांना उमेदवारीसाठी गळ घालण्याची स्पर्धा इच्छुकांमध्ये लागल्याचे चित्र आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हरिभाऊ बागडे यांच्यासोबत जिल्ह्यात आणि विशेषता फुलंब्री विधानसभा मतदारसंघात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते काम करत आहेत. बागडे नाना यांनी कधी हा जवळचा तो लांबचा असा भेदभाव केला नाही. परंतु, आपल्या पश्चात मतदारसंघाची धुरा दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवताना तो खांदाही तितकाच सक्षम आणि मजबूत असला पाहिजे याची खबरदारी बागडे नाना निश्चितच घेतील.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पुढील महिन्यात जागावाटप निश्चित होऊन उमेदवार अंतिम होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा संभाजीनगर दौरा इच्छुकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या दौऱ्यात बागडे नाना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराचे नाव पक्षश्रेष्ठींकडे कळविण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हरिभाऊ बागडेनाना यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असावा यासाठी इच्छुकांनी प्रयत्नांची परीकाष्टा सुरू केली आहे. आता यामध्ये कोणाच्या प्रयत्नांना यश मिळते? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
दरम्यान, राज्यपाल म्हणून राजस्थानचा पदभार स्वीकारल्यानंतर मतदारसंघात परतलेल्या बागडे नाना यांनी काही अनुभव माध्यमांशी बोलताना सांगितले. यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'पंतप्रधान घरकुल आवास योजना' तसेच 'हर घर नल' योजनेची व्याप्ती किती दूर पर्यंत पोहोचली आहे, हे बागडे यांनी आवर्जून सांगितले. पाकिस्तान सीमेवरील अगदी शेवटच्या घरापर्यंत 'हर घर नल योजना' आणि त्याद्वारे पिण्याचे पाणी पोहोचल्याचे बागडे यांनी अभिमानाने सांगितले. एकूणच सध्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघांमध्ये नानांच्या आगमनामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.