Mahayuti v/s Mahavikas Aghadi News : मराठा-ओबीसींसह सर्वच आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला मराठवाडा आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाच्या बाजूने उभा राहणार? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. अशावेळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिलेला मराठवाड्यातील मतदार विधानसभेला भाकरी फिरवणार का? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याने (Marathwada) शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने कौल दिला होता. 46 पैकी तब्बल 29 जागा युतीच्या पारड्यात गेल्या होत्या. यात सर्वाधिक 17 आमदार निवडून आणत भाजप मोठा भाऊ तर शिवसेना १२ जागांसह छोट्या भावाच्या भूमिकेत होती. मराठवाड्यासह राज्यात युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतांना महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि पुढे राज्याचे राजकारण वेगळ्याच दिशेने गेले.
दरम्यान, चौदा महिन्यापुर्वी मराठवाड्याच्या जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी गावातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले आणि राज्यातील वातावरण ढवळून निघाले. शिवसेना-राष्ट्रवादीत फूट, राज्यातील सत्तांतर याचा मराठवाड्यातील राजकारणावर मोठा परिणाम झाला. आरक्षणाच्या लढ्याने मराठवाडा गेल्या दीड वर्षापासून राज्याच्या राजकारणाचा केंद्र बिंदू ठरत आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस भूमिका न घेतल्याचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला. लोकसभेच्या 8 पैकी सात मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. (Mahayuti) छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीच्या वाट्याला आली. विधानसभा निवडणुक तोंडावर असतांना महायुतीला दिलासा देणारे निकाल हरयाणा राज्यातून आले. आता हाच हरयाणा पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होईल आणि महायुतीची पुन्हा सत्ता येईल, अशी अपेक्षा महायुती बाळगून आहे.
दुसरीकडे मराठा-ओबीसी आरक्षणाचा संघर्ष कायम आहे. लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने राहिलेला मराठवाडा विधानसभेला काय भूमिका घेतो? यावर राज्यात कोणाची सत्ता? हे ठरणार आहे. राज्याच्या सत्तेत मराठवाड्याने कायमच किंगमेकरची भूमिका वठवली आहे. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होते की महायुती? लोकप्रिय योजनांच्या जोरावर मुसंडी मारते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात अखंड राहिले. नुकसान झाले ते शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांचे. मराठवाड्यात 12 जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचे तीन आमदार सोडले तर बाकी सगळे आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. अशीच काहीसी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मराठवाड्यातील बोटावर मोजण्या इतके आमदार शरद पवारांसोबत उरले आहेत. तर बहुतांश आमदारांनी सत्तेची वाट धरत अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारले.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत तीन जागा जिंकत बाजी मारणाऱ्या काँग्रेसची ताकद विधानसभेच्या तोंडावर मराठवाड्यात वाढली आहे. 2019 मध्ये आठ आमदार असलेल्या काँग्रेसला हा आकडा वाढवायचा आहे. जागा वाटपात अधिक मतदारसंघावर दावा सांगत तो गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतील बलाबल पाहिले तर भाजपने सर्वाधिक 17, शिवसेना 12, काँग्रेस 8, राष्ट्रवादी 8, शेकाप 1 असे चित्र होते. सत्ताधारी महायुतीला लाडकी बहीण तारणार? की मराठा आरक्षणाचा मुद्दा बुडवणार? याचा फैसला लवकरच होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.